Swiggy, Zomato नंतर फूड डिलिव्हरीसाठी नवा पर्याय ONDC, काय आहे हे नवीन अॅप?
ONDC Food Delivery App: swiggy, zomato नंतर भारतीय आता फूड ऑर्डर करण्यासाठी नवा पर्याय वापरत असल्याचं पहायला मिळत आहे. ONDC या नव्या अॅपचा वापर खवय्ये करताना पाहायला मिळत आहे.
ONDC Food Delivery App: आपल्या आवडत्या रेस्टॉरंटमधून घरबसल्या फूड ऑर्डर करणे हे प्रत्येकासाठी खूप आवडीचे काम असते. परंतु काही वेळा काही फूड डिलिव्हरी करणारे अॅपवर उच्च कर आणि कमिशन आकारतात ज्यामुळे संपूर्ण ऑर्डरची किंमत वाढते. हे थांबवण्यासाठी आणि लोकांना स्वस्त पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी, भारत सरकारने ONDC (डिजिटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्क) तयार केले. हे प्लॅटफॉर्म रेस्टॉरंट्सना स्विगी, झोमॅटो (Swiggy, Zomato) इत्यादी फूड डिलिव्हरी अॅपचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न होऊ देता रेस्टॉरंट्सना (Restaurant) त्यांचे खाद्यपदार्थ थेट विकण्याची परवानगी देत आहे. हे अॅप व्यापारी आणि ग्राहकांचा थेट संपर्क करुन देते त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण यामध्ये नाही आहे. भारत सरकारने सुरु केलेला हा उपक्रम व्यापारी आणि ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत असल्याचं देखील आता म्हटलं जात आहे.
ONDC हे अॅप सप्टेंबर 2022 पासून अस्तित्वात आहे. तसेच आता हे अॅप दिवसागणिक आणखीनच लोकप्रिय होत असल्याचं चित्र पाहायला मिळत असून दररोज 10,000 पेक्षा अधिक फूड डिलिव्हरी करत असल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकं सातत्याने इतर फूड डिलिव्हरी अॅप आणि ONDC ची तुलना करत दोन्ही वरील किंमतीतील फरक निदर्शनास आणत आहेत. त्यातून असे दिसून आले की,इतर फूड डिलिव्हरी अॅप पेक्षा ONDC या अॅपवरुन कमी किंमतीत फूड डिलिव्हरी होत आहे. त्यामुळे आता बरेच खवय्ये या सुविधेला प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळत आहे.
परंतु हा पर्याय देशाच्या प्रत्येक शहरात उपलब्ध नाही आहे. तसेच अगदी मोजक्याच रेस्टोरंट्समध्ये ही सुविधा मिळत असल्याचं दिसत आहे. मग आता हे ONDC अॅप तुमच्या शहरात आहे का? सविस्तर पाहा.
ONDC हे कुठे उपलब्ध आहे?
ONDC हे अॅप सर्वप्रथम सप्टेंबर 2022 मध्ये सर्वप्रथम बेंगलोरमध्ये सुरु करण्यात आले. त्यामुळे सध्या तरी ही सुविधा फक्त बेंगलोर शहरात उपलब्ध आहे. परंतु आता या सुविधेला नागरिकांचा मिळत असलेला उत्फूर्त प्रतिसाद पाहून लवकरच हे अॅप इतर शहरात सुरु होणार असल्यांच आता म्हटलं जात आहे.