Nagpur : आता जिल्ह्यातील जमिनीची जलद व अचूक मोजणी, 15 आधूनिक रोव्हर यंत्रांचे वाटप
भूमी अभिलेख विभागाला 15 आधूनिक रोव्हर यंत्रांचे वाटप करण्यात आले. रोव्हर यंत्राचे प्रत्यक्ष मोजणी कामाचे प्रशिक्षण मोजणी कर्मचारी व सर्व्हेअर यांना प्रशिक्षण देण्यात आले.
नागपूर : सर्व्हे ऑफ इंडिया कडून संपूर्ण राज्यात उभारण्यात आलेल्या कॉर्स स्टेशनपैकी दोन स्टेशन नागपूर जिल्ह्यात कार्यान्वित आहेत. त्या कॉर्स स्टेशनला कनेक्ट करुन आधूनिक रोव्हर यंत्राच्या सहाय्याने जमीन मोजणीचे काम जलद व अचूक होणार आहे. सर्व भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या सेवेमूळे जलद व अचूकपणे मोजणीचे काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी प्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे रोव्हर यंत्र वाटप व तीन दिवशीय प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
कॉर्स सेंटरला जोडणार रोव्हर यंत्र
नागपूर विभागाचे उपसंचालक विष्णू शिंदे, उपसंचालक सलग्न जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख महेश खडतरे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जी.बी. दाबेराव यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी अत्याधूनिक रोव्हर यंत्राची कार्यप्रणाली यावेळी समजावून घेतली. त्यानूसार सर्व्हे ऑफ इंडिया कडून संपूर्ण राज्यात उभारण्यात आलेल्या कॉर्स सेंटरला रोव्हर यंत्र जोडून मोजणी कर्मचाऱ्यांनी अचूक काम करुन नागरिकांना दिलासा द्यावा, जमीन मोजणी अचूक करुन नागरिकांच्या समस्या जलद गतीने सोडवाव्यात, असे त्यांनी सांगितले.
15 आधूनिक रोव्हर यंत्र
जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत भूमी अभिलेख विभागाला 15 आधूनिक रोव्हर यंत्र झाले असून त्याचे वाटप जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. रोव्हर यंत्राचे प्रत्यक्ष मोजणी कामाचे प्रशिक्षण मोजणी कर्मचारी व सर्व्हेअर यांना देण्यासाठी 19 ते 21 जुलै या तीन दिवसाचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले. नागपूर जिल्ह्यातील उप अधीक्षक भूमी अभिलेख व नगर भूमापन अधिकारी नागपूर यासह भूमी अभिलेख काया्रलयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचा