Nagpur IGMC : मेयोच्या भिंतीला लागला पाण्याचा झरा, तीन दिवसांपासून सीटीस्कॅन बंद
सीटीस्कॅन असलेल्या वार्डाच्या भिंतीतून पाणी गळती होत असल्याने मेयोमधील रुग्णांना सुविधा मिळत नाही आहे. गंभीर आजार असलेल्या रुग्णांना खासगी केंद्रांवर हजारो रुपये खर्च करुन सीटीस्कॅन करावे लागत आहे.
नागपूरः एकीकडे विदर्भात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. अनेक जिल्ह्यांना पुराने वेढा घातला आहे. दुसरीकडे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येसह पावसाळी आजारांनी मान वर काढली आहे. मात्र जिल्हाच नव्हे तर मध्यप्रदेश, छत्तीसगढच्या रुग्णांच्या आरोग्य सेवेचा डोलारा असणाऱ्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) सीटी स्कॅनही बंद पडले आहे. दोन दिवसांपासून मेयोतील सीटी स्कॅन बंद असल्याने तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना चकरा माराव्या लागत आहे. तर काहींना खासगी केंद्रात जाऊन स्कॅन करण्याचा अजब सल्लाही देण्यात येत असल्याची माहिती आहे. यामुळे गंभीर रुग्णांची गैरसोय होत आहे.
मेयोत सीटी स्कॅनची सुविधा असलेल्या वॉर्डाच्या भिंतीतून पाण्याचा झरा लागला आहे. अखंडित पाणी पडत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सीटी स्कॅन बंद ठेवावे लागले आहे. छत व भिंतीतून पाणी गळती सुरू झाल्यानंतर तत्काळ रुग्णालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिली गेली. पण, तेव्हापासून अद्याप कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही. गळती सुरू असल्याने सीटी स्कॅनही सुरू करता येऊ शकले नाही.
विशेष म्हणजे या प्रकराची रुग्णांना माहितीच नाही. तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना सध्या मशिन बंद आहे. थोड्या वेळाने ते सुरू होईल, अशी बतावणी केली जात आहे. यामुळे तपासणीसाठी येणारे काही रुग्ण रुग्णालय परिसरातच थांबून वाट बघतात. तर काही रुग्ण घरी परततात. काही वेळाने नातेवाईक पुन्हा येऊन विचारणा करतात. पुन्हा तेच उत्तर मिळते. वारंवार चकरा मारुन कंटाळलेले रुग्ण आल्या पावली परत जात असल्याची माहिती आहे.
मात्र याच दरम्यान उपस्थित कर्मचारी हळूच त्या रुग्णाला खासगी केंद्राबद्दल सल्ला देतो. रुग्णाने तयारी दर्शविल्यास त्याला पत्ताही सांगण्यात येत आहे. शासनाने कोट्यावधीचा खर्च करुन उभारलेल्या सुविधा रुग्णांना मिळत नसल्याने गरीबांची पिळवणूक होत आहे. मेयो रुग्णालयात रोज साधारणपणे 80 ते 100च्या घरात रुग्णांचे सीटीस्कॅन करण्यात येतात. मात्र प्रशासनाच्या नियोजनशून्य पद्धतीचा फटका रुग्णांना बसत आहे.