(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Covid Update : कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा दोनशे पार, 42 रुग्ण हॉस्पिटलमध्ये
मनपाच्या सर्व दहाही झोनमधील आरोग्य केंद्रांवर कोरोना लसीचे बुस्टर डोस देण्यात येत असून नागरिकांनी पुढाकार घेऊन लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन मनपाच्यावतीने करण्यात आले आहे.
नागपूरः जिल्ह्यात कोरोना बाधितांची संक्या झपाट्याने वाढत असून मंगळवारी प्राप्त अहवालानुसार 208 नवे कोरोनाबाधित आढळून आले. यात शहरातील 133 तर ग्रामीणमधील 75 बाधितांचा समावेश आहे. तर मंगळवारी तर 140 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. मात करणाऱ्यांमध्ये 99 बाधित शहरीभागातील तर 41 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. सध्या जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधित संख्या 1262 वर पोहोचली आहे. शहरात 856 बाधित आहेत. तर, ग्रामीणमध्ये 406 बाधितांची नोंद झाली आहे.
मागिल काही दिवसांपासून आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या कमी करण्यात आली होती. त्यामुळे बाधितांची संख्याही कमी आढळून येत होती. मात्र आता मंगळवारी जिल्ह्यात 2195 आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. तर 359 रॅपिड अॅन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे या चाचण्यांचा अहवालात नक्कीच बाधितांची आकडेवारी जास्त येऊ शकते असा अंदाज आहे. सध्या यापैकी तब्बल 42 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर 1220 बाधित गृहविलगीकरणात आहेत. सर्वाधिक बाधित म्हणजेच 15 रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती आहेत. तर इतर बाधितांवर मेयो आणि काही खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बुस्टर डोसला नागपूरकरांचा उत्तम प्रतिसाद
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये शुक्रवारी 15 जुलै रोजी 18 वर्षावरील सर्वांच्या कोव्हिड प्रतिबंधात्मक बुस्टर डोसच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पुढील 75 दिवस चालणाऱ्या या लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच दिवशी नागपूरकरांनी उत्तम प्रतिसाद दर्शविला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, अनुसंधान केंद्र मध्ये फक्त कोव्हॅक्सीन लस उपलब्ध राहील. कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन यापैकी कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेउन 6 महिन्याचा कालावधी पूर्ण झालेल्या 18 वर्षावरील वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस घेता येणार आहे. यासाठी शहरात प्रत्येक झोनमध्ये विविध ठिकाणी लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण आवश्यक आहे. स्वत:च्या आरोग्यासह इतरांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही लसीकरण महत्वाचे आहे. त्यामुळे लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या आणि दुस-या डोसपासून सहा महिने पूर्ण झालेल्या प्रत्येक पात्र व्यक्तीने लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी झालेले असले तरी धोका मात्र टळलेला नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करून ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले त्यांना बुस्टर डोस देण्याचा महत्वाचा निर्णय केंद्र सरकारद्वारे घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने नागपूर शहरातील बुस्टर डोससाठी पात्र प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणासाठी मनपाद्वारे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.