(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याला दिवाळी भेट देणार? 17 हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजूरी मिळण्याची शक्यता
- मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याला दिवाळी भेट देणार ?- एम एम आर डी ए कडून आलेल्या 21 प्रस्तावांना मंजुरी मिळणार ?- १७ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची दिवाळी भेट ठाणेकरांना मिळणार ?
Thane : ठाण्यातील वाहतूक कोंडी आता कळीचा मुद्दा बनली आहे. वारंवार होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे ठाण्यासोबतच मुंबई आणि आसपासच्या शहराला देखील फटका बसतो. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून ठाणे जिल्ह्यात तब्बल 17 हजार कोटींचे 21 प्रकल्प प्रस्तावित आहेत. ज्यांना मंजुरी मिळाल्यास वाहतूक कोंडी तसेच इतर समस्या या कायमस्वरूपी नाहीशा होतील.
ठाणे जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण दिवसाच्या आर्थिक राजधानीत जाणारे सर्व रस्ते या जिल्ह्यातून जातात. मात्र गेल्या काही काळात ठाण्यातील पायाभूत प्रकल्पांच्या अभावामुळे वाहतूक कोंडी आणि इतर समस्या या प्रचंड वाढल्या आहेत. त्यात मुख्यमंत्री देखील ठाण्याचे असल्यामुळे वैतागलेले नागरिक वारंवार ठाणेकर मुख्यमंत्र्यांना तक्रारी देऊन थकले होते. अखेर मुख्यमंत्र्यांनी यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून दिवाळी गिफ्ट देण्याचे ठरवले आहे. एम एम आर डी ए ने ठाणे जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तब्बल 17 हजार कोटींचे प्रस्ताव तयार केले आहेत. ज्यांना मंजुरी देखील लवराच मिळेल अशी शक्यता आहे
मुंबईत काम करणा-या चाकरमान्यांची संख्या कोट्यावधींच्या घरात आहेत… यातील बहुतांश चाकरमानी हे ठाणे जिल्ह्यातील आहेत… आणि यांना मुंबईला येण्यासाठी रेल्वेने प्रवास करणे हा एकच पर्याय आहे कारण रस्ते नेहमी वाहतूक कोंडीने भरलेले असतात… जर ही वाहतूक कोंडी फोडायची असेल तर नवनवीन प्रकल्प आणून रस्त्यांचा आणि शहरांचा विकास करणे हा एकच पर्याय आहे … ते पाहता शिंदे फडणवीस सरकारने आणलेले हे 21 प्रकल्प या ठाणे जिल्ह्याला नव संजीवनी देणारे ठरतील यांत काही शंका नाही…
कोपरी ते पटणी खाडीपूल हा सहा पदरी असुन लांबी एक किमी आहे तर या प्रकल्पाला 333 कोटी खर्च येणार आहे
गायमुख ते भिवंडी दरम्यान तीन खाडीपूल बांधण्यात येणार आहेत या करता एक हजार 698 कोटी खर्च येणार आहेत
ठाणे कोस्टल रोड भाग 2 - गायमुख ते फाउंटन हॉटेल 5.36 किमी लांबीचा रस्ता आणि खारेगाव ते कोपरी ७.३४ किमी लांबीचा रस्ता २ हजार १०७ कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात येणार आहे
मुरबे ते सातपाटी (पालघर) खाडीवर नवीन पुलाची बांधणी केली जाणार आहे याची लांबी 3 किमी आणि 365 कोटी रुपये या प्रकल्पाकरता खर्च येणार आहे
शिळ फाटा ते माणकोली - 9 किमीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे… उल्हास नदीवर 1.6 किमीचा खाडीपूल बांधला जाणार, देसाई खाडीवर 70 मीटर लांबीचा पूल बांधला जाणार, दिवा पूर्व आणि पश्चिम जोडणीसाठी 610 मीटर लांबीचा उड्डाणपूल बांधला जाणार याकरता 1 हजार 440 कोटी रुपये खर्च येणार आहे
कल्याण ते माणकोली (बापगांव) गांधारी खाडीवरील सद्यस्थितीतील दोन पदरी पुलाचे चौपदरीकरण केले जाणार आणि गांधारी पुल ते राष्ट्रीय महामार्ग दुपदरी रस्त्याचे चौपदरीकरण करून काँक्रीटीकरण केले जाणार ज्या करता 400 कोटी रुपये येणार आहे
ठाण्यातील दहिसर ते महापे नवीन बोगदा, नवी मुंबई, कल्याण, अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर आणि पडघा यांना जोडणारा महानगरातील प्रादेशिक मार्ग प्रस्तावित असून याकरता १ हजार ५५८ कोटी रुपये खर्च येणार आहे
दहिसर ते मुरबाड रस्ता हा 40 किमीचा रस्ता प्रस्तावित असून याकरता 3 हजार 372 कोटी रुपये खर्च येणार आहे
टिटवाळा ते बदलापूर रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण केले जाणार ज्या करता 959 कोटी रुपये खर्च येणार आहे
वसई ते पालघर नारींगी खाडीवर ४.५६ किमी लांबी दुपदरी पूल बांधला जाणार आहे ज्या करता 645 कोटी रुपये खर्च येणार आहे
जर या सर्व प्रकल्पांना एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली तर ठाण्यातील अर्ध्याहून जास्त समस्या या चुटकीसरशी गायब होतील. त्याचा फायदा फक्त ठाणे करायलाच नाही तर मुंबई आणि आसपास राहणाऱ्या सर्व नागरिक आणि प्रवाशांना होणार आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर या प्रकल्पांना मान्यता द्यावी अशी आशा व्यक्त केली जात आहे....