Raj Thackeray on Ajit Pawar : सकाळचा शपथविधी झाला, काकांनी डोळे वटारले अन् अर्ध्या तासात लग्न मोडलं; राज ठाकरेंकडून अजित पवारांची मिमिक्री
Raj Thackeray on Ajit Pawar : पुण्यात कसबा विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांच्यासाठी राज ठाकरेंनी सभा घेतली. या सभेतून त्यांनी अजित पवार यांची मिमिक्री करत तोफ डागली.
पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना रंगणार असून दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) एकला चलो रे चा नारा दिलाय. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून मनसेच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला जात आहे. काल पुण्यात कसबा विधानसभा मतदारसंघात (Kasba Assembly Constituency) मनसेचे उमेदवार गणेश भोकरे (Ganesh Bhokare) यांच्यासाठी राज ठाकरेंनी सभा घेतली. या सभेतून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मिमिक्री करत जोरदार तोफ डागली. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरही राज ठाकरेंनी निशाणा साधला.
राज ठाकरेंची अजित पवारांवर टीका
सकाळचा शपथ विधी झाला. अर्ध्या तासात लग्न मोडलं, कारण काकांनी डोळे वटारले, असे म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांची नक्कल करून दाखवली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला होता. अजित पवार जेव्हा बोलतात तेव्हा पूर्णविराम, स्वल्पविराम, उद्गारवाचक चिन्ह, काहीही नसतं एकदम सरळ बोलत जातात, असा टोलाही राज ठाकरेंनी अजित पवारांना लगावला.
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना टोला
अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळत असताना अचानक 40 जण निघून गेले आणि पक्षाला पत्ताच नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. अजित पवारांसोबत आपलं पटत नाही म्हणून एकनाथ शिंदे बाहेर पडले, त्यानंतर कोणीतरी एकमेकांना डोळे मारले आणि ज्यांना मांडीला मांडी लावून बसायचं नव्हतं ते अजित पवार येऊन यांच्या मांडीवर बसले, असे म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरदेखील निशाणा साधला.
कसबा, कोथरूडच्या जागा महत्त्वाच्या
दरम्यान, मी ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडलो. त्यानंतर मी माझा पहिला महाराष्ट्र दौरा सुरु केला. त्यानंतर पक्षाची स्थापना केली. पक्षाची स्थापना करण्याआधी कसब्याच्या गणपतीची पूजा करून मी पक्षाची स्थापना केली असल्याचे म्हणत राज ठाकरे यांनी कसबा आणि कोथरूडच्या जागा माझ्यासाठी महत्त्वाच्या असल्याचे यावेळी नमूद केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
साताऱ्यात पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, आमची थोडीफार इज्जत राहिली; अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा!