राधाकृष्ण विखे पाटील यांनी निवेदन न स्वीकारल्याने शेतकरी आक्रमक, सोलापूरच्या नियोजन भवनात गोंधळ
Solapur News Update : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कांद्याला हमीभाव द्यावा या मागणीचे निवेदन न स्वीकारल्यामुळे सोलापुरातील शेतकरी संतप्त झाले आहेत.
Solapur News Update : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी कांद्याला हमीभाव द्यावा या मागणीचे निवेदन न स्वीकारल्यामुळे सोलापुरातील शेतकरी संतप्त झाले आहेत. सोलापुरात राधाकृष्ण विखे पाटील यांची बैठक सुरु असलेल्या नियोजन भवनात शेतकऱ्यांनी यावरून गोंधळ घातला. कांद्याला हमीभाव द्यावा या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत विखे पाटील यांनी राजीनामा देण्याची मागणी केली.
राधाकृष्ण विखे पाटील यांची विविध विकास कामासंदर्भात सोलापुरातील नियोजन भवन येथे आढावा बैठक सुरु आहे. यावेळी जनहित शेतकरी संघटने अध्यक्ष प्रभाकर देशमुख काही शेतकरी आणि कार्यकर्त्यांसोबत विखे-पाटील यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. परंतु, विखे-पाटील यांनी निवेदन स्वीकारले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी प्रभाकर देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. देखमुख यांना ताब्यात घेतल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी नियोजन भवनात गोंधळ घातला. विखे-पाटील यांनी त्वरीत सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु, संतप्त कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
प्रभाकर देशमुख यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गाडीवर कांद्याने आंघोळ घालण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे विखे-पाटील नियोजन भवनात पोहोचण्याआधीच पोलिसांनी तेथे बंदोबस्त वाढवला होता. यातून देखमुख यांनी विखे-पाटील यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. परंतु, विखे-पाटील हे निवेदन न स्वीकारताच निघून गेले. विखे-पाटील यांच्या या भूमिकेमुळे नियोजन भवनात कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांनी देखमुख यांना ताब्यात घेतले. "शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आम्हाला गोळ्या घालणार का असा संतप्त सवाल देशमुख यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, या गोंधळानंतर, गोंधळ घातले की आपले पुढारीपण सिद्ध होत नाही, असे विखे-पाटील यांनी म्हटलं आहे. "एखाद्या गोष्टीचं राजकारण करून तुम्ही माध्यमांसमोर आवाज उठवणार असाल आणि त्यातून प्रश्न सुटेल असं त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. नाफेडने काही ठिकाणी कांदा खरेदी सुरू केलं नसल्याचे समोर आलंय. ज्या शेतकऱ्यांनी गोंधळ घातला त्यांच्याशी अजूनही चर्चा करायची आहे. त्यासाठी माझी तयारी आहे. त्यांना बोलून घेऊन त्यांच्या मनात काही दुराग्रह असेल तर तो दूर करेन, असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.