उजनी धरणातून विसर्ग वाढणार? सीना व भीमा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कतेच्या सूचना
solapur News Update : उजनी धरणात आज दुपारी एक वाजता उपयुक्त पाणीसाठा 108.08 टक्के इतका झाला आहे. सद्यस्थितीत दौंड येथील भीमा नदीवरील सरीता मापन केंद्राच्या खालील बाजूस उजनी धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू आहे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या उजनी धरणातून (Ujani Dam) विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीना आणि भीमा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
उजनी धरणात आज दुपारी एक वाजता उपयुक्त पाणीसाठा 108.08 टक्के इतका झाला आहे. सद्यस्थितीत दौंड येथील भीमा नदीवरील सरीता मापन केंद्राच्या खालील बाजूस उजनी धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा आणि सीना नदीमध्ये विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. धरणातून विसर्ग वाढला तर पुरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
धरणाच्या उपयुक्त पाणी साठ्यामध्ये लवकरच मोठया प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीमध्ये उजनी धरणाच्या सांडव्यावरून भिमा नदीमध्ये 50000 क्युसेक्सने विसर्ग चालू असून आज दुपारी दोन वाजता उजनी धरण सांडव्यावरून भिमा नदीमधील विसर्गामध्ये वाढ करून 60000 क्यूसेक्सने विसर्ग करणेत आलेला आहे. त्यामुळे नदीतील एकूण विसर्ग सांडवा 60000 क्यूसेक्स व विद्युत गृह 1600 क्यूसेक्स असा एकूण 61600 क्यूसेक्स विसर्ग भीमा नदीमध्ये राहणार आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवक नुसार विसर्ग कमी जास्त होण्याची शक्यता आहे.
जिल्हा प्रशासनाकडून आव्हान
संभाव्य हानी टाळण्यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे. तरी सिना व भिमा नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी सतर्क राहावे. संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावे. तसेच मोठ्या प्रमाणात सोडलेल्या विसर्गांमुळे नदी, नाले, ओढे यावर असलेल्या पुलावरील गार्ड स्टोनवरून पाणी वहात असल्यास कोणत्याही नागरिकांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असेही जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
पंढरपूर प्रशासन सतर्क
भीमा नदीत सध्या उजनी धरणातून 60 हजार क्यूसेकने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय. उजणीत पाणीसाठी वाढत असल्यामुळे पंढरपू प्रशासन देखील सतर्क झालं आहे. कारण चंद्रभागा नदीला देखील पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंद्रभागा नदीत 85 हजार क्युसेकचा विसर्ग पोहोचल्यानंतर परिस्थिती अवघड बनण्यास सुरुवात होणार आहे. चंद्रभागेत 1 लाख 10 हजार क्युसेकच्या विसर्गाने पाणी आल्यास शहरातील व्यास नारायण मंदिर, बडवे चर याठिकाणी पाणी शिरण्यास सुरुवात होते. यासोबतच सरकोली, पटवर्धन कुरोली, उंबरे पागे यासारख्या ग्रामीण भागातील 8 गावात देखील पाणी शिरण्यास सुरुवात होते. दरम्यान, पंढरपूर तालुक्यात भीमा नदीच्या उजव्या काठावर 13 तर डाव्या तीरावर 28 गावे आहेत. याशिवाय ओढे आणि नाल्यात हे नदीचे पाणी शिरुन धोका होणारी काही गावे असून, एकूण 46 गावांना पुराचा धोका संभवू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
