मुलीच्या निर्घृण हत्येनंतर डिप्रेशनमध्ये, शेवटची इच्छाही अधुरीच राहिली; श्रद्धा वालकरच्या वडिलांनी घेतला अखेरचा श्वास
Shraddha Walker Father Vikas Walkar Death: श्रद्धा वालकर हिचे वडील विकास वालकर यांचे आज निधन झाले आहे.

Shraddha Walker Father Vikas Walkar Death वसई: वसईतील संस्कृती सोसायटीत आज (9 फेब्रुवारी) सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात (Shraddha Walker Murder Case) तिला न्याय मिळावा म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करणारे तिचे वडील विकास वालकर (Vikas Walkar) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज 8 वाजता अचानक विकास वालकर यांची प्रकृती बिघडली आणि तातडीने त्यांना कार्डिनल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी विकास वालकर यांना मृत घोषित केले.
मुलीच्या निर्घृण हत्येनंतर विकास वालकर यांचे जीवन दुःखाच्या छायेत गेले होते. मुलीच्या स्मृतीने व्याकूळ झालेल्या या बापाने तिच्या आत्म्याला न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांनी न्यायालयाच्या दारात उभं राहून, मीडियासमोर बोलून आणि जनतेच्या मनाला साद घालून एकच मागणी केली ती म्हणजे “श्रद्धाच्या खुनीला फाशी हवी...”
न्यायासाठी सुरू ठेवला लढा, पण…
श्रद्धाच्या अमानुष हत्येनंतर केवळ स्वतःच्या दुःखात हरवून न जाता, इतर श्रद्धांना वाचवण्यासाठी विकास वालकर यांनी “श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्ट” ची स्थापना केली. मुलीच्या आठवणींना न्याय देण्याचा हा त्यांचा शेवटचा प्रयत्न होता. जो बाप मुलीसाठी न्याय मागत होता, तो न्याय मिळण्याआधीच काळाने त्याला हिरावून घेतले. विकास वालकर यांचे स्वप्न अधुरेच राहिले.
“बाबा, तुम्ही आज असता तर…”
जर आफताबला फाशीची शिक्षा मिळाली असती, तर कदाचित विकास वालकर यांना एक समाधान मिळाले असते. पण आता त्यांचा आवाज कायमचा शांत झाला. न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत राहणाऱ्या या पित्याचा अखेरचा श्वास आज थांबला.
एक शून्यात हरवलेला आवाज…
विकास वालकर हे फक्त श्रद्धाचे वडील नव्हते, तर समाजासाठी एक शिकवण होते—प्रेमाच्या नावाखाली फसवणूक होऊ नये, मुलींनी सुरक्षिततेबद्दल जागरूक व्हावं आणि कोणत्याही पित्याला आपल्या लेकराच्या निर्घृण हत्येचे दुःख भोगावे लागू नये.
नेमकी घटना काय?
2022 मध्ये दिल्लीत श्रद्धा वालकरची हत्या झाली होती. तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावालाने तिची हत्या केली होती. दिल्ली पोलिसांनी 12 नोव्हेंबर 2022मध्ये आफताबला अटक केली. तेव्हापासून तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे. या हत्येचा खटला न्यायालयात सुरू आहे. आपल्या मुलीला मृत्यूनंतर न्याय मिळावा म्हणून विकास वालकर न्यायालयीन खटला लढत होते. आरोपी आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करून तिचे मृतदेहाचे तुकडे दिल्लीतील वेगवेगळ्या भागात फेकले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्याची कसून तपासणी केली असता त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवल्याचंही उघड झालं होतं. विशेष म्हणजे सहा महिन्यानंतर श्रद्धाचे वडील विकास यांनी मुलगी हरवल्याची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. अडीच महिन्यापासून आपल्या मुलीचा काहीच संपर्क होत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.






















