Sangli News : आक्षेपार्ह वक्तव्यांची मालिकाच लावलेल्या संभाजी भिडेंच्या प्रतिमेस शिवप्रतिष्ठानकडून दुग्धाभिषेक!
संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच आहे. आता या मालिकेत महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याची भर पडली आहे. संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
Sangli News: आंबे खाण्यापासून ते टिकली लावण्यापर्यंत ते पार राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्यापर्यंत संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच आहे. आता या मालिकेत महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याची भर पडली आहे. संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याचा निषेध करत सांगलीत शिवप्रतिष्ठानकडून संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालण्यात आला.
सांगली शहरातील मारुती चौकात संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला. गुरुजींवर व्हिडिओवरून आरोप करणाऱ्यांनी तो व्हिडिओ तपासावा आणि मग आरोप करावे अन्यथा राज्यात रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा हाती घेतील असा इशारा या निमित्ताने देण्यात आला. महात्मा गांधी यांच्याबाबत संभाजी भिडे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यात सडकून टीका होत आहे. भिडे यांच्या विरोधात राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत अमरावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये कार्यकर्ते जमले होते. अमरावतीमध्ये महात्मा गांधी यांच्याबाबत भिडेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केले असल्याचा आरोप करण्यात येत असला, तरी आरोप करणार्यांनी मूळ चित्रफित पाहून खात्री करावी. अमरावतीमध्ये गुन्हा दाखल झाला असला तरी आम्ही कायदेशीर लढाई तर लढूच पण, जाणीवपूर्वक होत असलेला अवमान आम्ही सहन करणार नाही असा इशारा यावेळी हणमंतराव पवार यांनी दिला.
पुरोगामी संघटनांकडून धरणे आंदोलन
दरम्यान, भिडे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेस व पुरोगामी संघटनांकडून उद्या सोमवारी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
मनोहर भिडे यांच्यावर सरकारने त्वरीत गुन्हे दाखल करा
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अत्यंत खोचक शब्दात भिडे यांचा समाचार घेतला आहे. त्यांनी ट्विट करून मनोहर भिडे (संभाजी भिडे) यांच्यावर सरकारने त्वरित गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह असे वक्तव्य केले आहे. भिडे यांनी यापूर्वी देखील अनेक अनैतिहासिक आणि अवैज्ञानिक विधाने करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न केला आहे. अशाप्रकारे समाजात दुही माजवणाऱ्या विधानांचा मी वेळोवेळी निषेध करत आलो आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे या देशाच्या निर्मितीमधील योगदान अमूल्य असे आहे. केवळ भारतच नाही तर जगभर गांधींच्या विचारांना आदर व सन्मान आहे. मनोहर भिडे यांच्यावर सरकारने त्वरित गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी.
इतर महत्वाच्या बातम्या