(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यातील प्रसिद्ध 'एसपीज्' बिर्याणीमध्ये आढळल्या अळ्या, षडयंत्र असल्याचा व्यवस्थापनाचा दावा
पुणेकरच नाही, तर अगदी पुण्याबाहेरील मंडळीही एस पीज् बिर्याणीवर ताव मारण्यासाठी येतात. त्यामुळेच आपल्या व्यवसायाला बदनाम करण्याचं हे षडयंत्र असल्याचं जवाहर चोरगे यांनी म्हटलं आहे.
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध एसपीज् बिर्याणी या हॉटेलमध्ये बिर्याणीमध्ये अळ्या सापडल्याचा आरोप एका ग्राहकाने केला आहे. विरेंद्र ठाकूर हे आपल्या मुलासह आज दुपारी एसपीज् बिर्याणीमध्ये जेवण्यासाठी गेले होते, त्यावेळी हा प्रकार घडला.
विरेंद्र यांना बिर्याणी खाताना ताटात अळी दिसली. त्यानंतर त्यांनी याचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. हा सगळा प्रकार त्यांनी एसपीज् बिर्याणी व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिला, मात्र एसपीज् बिर्याणी व्यवस्थापनाने त्यांचे आरोप फेटाळून लावले. बिर्याणी ज्या तापमानाला शिजवली जाते त्या तापमानाला अळी राहूच शकत नाही, असा दावा एसपीज् व्यवस्थापनाने केला आहे.
बिर्याणी एवढी गरम असते की त्या तापमानात अळी अक्षरश: वितळून जाऊ शकते. एसपीज् बिर्याणी पुण्यात आणि पुण्याबाहेर सर्वत्र प्रसिद्ध आहे. लांबून लोक येथील बिर्याणी खाण्यासाठी येतात. त्यामुळे आपल्या व्यवसायाला बदनाम करण्याचं हे षडयंत्र असल्याचं जवाहर चोरगे यांनी म्हटलं.
तर दुसरीकडे विरेंद्र ठाकूर या व्यक्तीने एसपीज् बिर्याणीच्या व्यवस्थापनाने आपली माफी मागावी, अशी मागणी केली आहे. एसपीज् बिर्याणीच्या विरोधात ठाकूरने कोणतीही तक्रार अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे दिलेली नाही.