वेदिकाची मृत्यूशी झुंज अपयशी, 16 कोटींच्या इंजेक्शनंतरही वेदिकाचा उपचारादरम्यान मृत्यू
फेब्रुवारी महिन्यात वेदिकाच्या शरीरातील हालचाली या नैसर्गिकरित्या होत नसल्याचं दिसून आलं होतं. म्हणून तिच्या आई-वडिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता.
पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या वेदिका शिंदे या चिमुरडीची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. वेदिकाला स्पायनल मस्कुलर ऍट्रॉफी हा दुर्मिळ आजार झाला होता. यासाठी तिला तब्बल 16 कोटी रुपयांची झोलगेन्स्मा ही लस देण्यात आली होती. यासाठी आई-वडिलांनी लोकासहभागासाठी आवाहन केलं होतं, त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. म्हणूनच देश-विदेशातील अनेक दात्यांनी हातभार लावला होता. या सर्वांच्या प्रयत्नाने अमेरिकेतून झोलगेन्स्मा लस आयात करण्यात यश आलं होतं. 15 जूनला पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तिला ही लस देण्यात आली. आता ती ठणठणीत बरी होईल अशीच अख्ख्या देशाला अपेक्षा होती. पण रविवारी मात्र ही दुःखद बातमी आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीये.
फेब्रुवारी महिन्यात वेदिकाच्या शरीरातील हालचाली या नैसर्गिकरित्या होत नसल्याचं दिसून आलं होतं. म्हणून तिच्या आई-वडिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला, तेव्हा या लहान चिमुरडीला दीर्घायुष्य हवं असेल तर तब्बल 16 कोटी रुपयांची लस द्यावी लागणार असल्याचं समजलं. कारण ह्या आजारामध्ये खूप जलद गतीने बाळाच्या नसा आणि स्नायू कमकुवत होतात. शिवाय जसजसे हे प्रमाण वाढत जाते तसतसे रुग्णाला श्वास घेणे, चालणे, शरीराची हालचाल करणे, मान धरणे या सगळ्या क्रिया करताना त्रास व्हायला सुरुवात होते आणि वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर शरीरातील सगळे भाग निकामी होऊन रुग्ण दगावतो.
पण वेदिकाच्या आई-वडिलांनी हार मानली नाही. 16 कोटी रुपयांसाठी त्यांनी समाजाकडे मदतीची हाक दिली. बघता-बघता पैसे जमा होऊ लागले. आई-वडिलांनी महाराष्ट्र पिंजून प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि अखेर जून महिन्यात 16 कोटी उभे राहिले. अमेरिकेहून झोलगेन्स्मा लस ही आली. 15 जूनला ती लस वेदीकाला देण्यात आली. नंतर तिचं शरीर लसीला साथ देऊ लागलं, सकारात्मक हालचाली दिसू लागल्या. सगळं सुरळीत होताना दिसू लागलं, पण गेल्या काही दिवसांत तिची तब्येत पुन्हा खालाऊ लागली.
31 जुलैला त्यात पुन्हा सुधारणा झाली, रविवारी दुपारपर्यंत देखील ती चांगला प्रतिसाद देत होती. फेसबुकवर तिच्या नावाने असलेल्या पेजवर तिचे व्हिडीओ पोस्ट करत तशी माहितीही देण्यात आली. तिचे वडील सौरभ शिंदेंनी फेसबुकवर स्टेटस ठेवत हितचिंतकांना कळवलं. पण त्यानंतर अचानक वेदिकाची तब्येत खालावली अन तिने जगाचा निरोप घेतला. गेली सहा महिने तिच्या जगण्याचा संघर्ष सुरू होता, पण रविवारी मात्र तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. ही दुःखद बातमी येताच देशात हळहळ व्यक्त केली जातीये.