Rice Farming : कमी पावसाच्या भागात यशस्वी भात शेती, दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रयोग
कमी पाऊस पडणाऱ्या दौंड (Daund) तालुक्यात भात शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे.
Rice Farming : ज्या भागात जास्त पाऊस (Rain) पडतो त्या भागात भात शेती केली जाते. जास्त पावसाच्या भागातील मुख्य पीक म्हणून भात (Rice) शेतीकडं पाहिलं जातं. परंतू, कमी पावसाच्या पट्ट्यात भात शेती होतं असं जर तुम्हाला सांगितले तर? मात्र, कमी पाऊस पडणाऱ्या दौंड (Daund) तालुक्यात भात शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. तालुक्यातील खडकी येथील संदीप काळे आणि रंगनाथ काटे यांनी 3 एकरावर इंद्रायणी भाताच्या वाणाची लागवड केली आहे.
खडकी येथील भात शेती पाहून तुम्हाला अस वाटेल की ही शेती कोकणातील भात शेती आहे.पण ही दौंड तालुक्यातील यशस्वी बात शेती आहे. भात पीक हे प्रामुख्याने जास्त पावसाच्या भागात घेतलं जातं. पंरतू, कमी पावसाच्या ठिकाणी देखील भात पीक येऊ शकते हे या शेतकऱ्यांनी सिद्ध केलं आहे. उसाच्या पिकाला पर्यायी पीक म्हणून भात शेतीकडे पाहत असल्याचे शेतकरी संदीप काळे यांनी सांगितले. उसाला 18 महिने सांभाळावे लागते. तसेच ऊस पिकाला भाताच्या तुलनेत खर्च मोठ्या प्रमाणावर येतो. रंगनाथ काटे आणि संदीप काळे यांनी मिळून खडकी गावात 3 एकरावर इंद्रायणी भात पिकाची लागवड केली. यासाठी लागणारी रोपे त्यांनी तळेगांववरुन आणली होती. दौंड तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यानं 2 ते 3 गुंठ्याची भाताची खाचरे तयार केली. ही खाचरे भात शेतीत पाणी साठून राहण्यासाठी तयार केली आहेत. त्याच खाचरात विहिरीचे पाणी सोडले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दौंड तालुक्यात मोठया प्रमाणावर ऊस उत्पादक शेतकरी आहेत. ऊस पिकाला पर्याय म्हणून ही भात शेती केली असल्याचे काटे आणि काळे या शेतकऱ्यांनी सांगितले. भाताच्या पिकाला एकरी 10 हजार रुपये त्यांना खर्च आला असल्याचे सांगितले. तसेच एका एकरात 15 ते 16 क्विंटल उत्पादन मिळते. त्याची विक्री ही 60 रुपये किलोने होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी सांगितली. यंदाचे काटे यांचे भात शेतीचे हे तिसरे वर्ष आहे. दौंड तालुक्यात भात शेती करणारे काटे आणि काळे हे पहिलेच शेतकरीअसल्याचे ते स्वतः सांगतात. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे पीक त्यांनी उभं केलं आहे. चाकोरीबद्ध पिकातून त्यांनी वेगळं पीक निवडले आणि ते पीक यशस्वी देखील करून दाखवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Rice Production : यंदा तांदळाचे विक्रमी 130.29 दशलक्ष टन उत्पादन होण्याचा अंदाज, कृषी मंत्रालयाची माहिती
- Rice Sowing : यंदा भात लागवडीत घट, 5 ऑगस्टपर्यंत लागवड 13 टक्क्यांनी घटली