Ravi Landge : भोसरीमधून ठाकरे गटाला मोहरा मिळाला; भाजप नेता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार
Ravi Landge : रवी लांडगे विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असून राऊत यांची भेट झाल्यापासून भोसरीतील राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे आहेत.
Ravi Landge : पिंपरी-चिंचवड शहरात (Bhosari) भाजपची पाळेमुळे खोलवर रुजविणारे भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांचे पुतणे आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दिवंगत बाबासाहेब लांडगे यांचे पुत्र रवि लांडगे यांनी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (20 ऑगस्ट) मुंबईत मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रवि यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांनी भाजप रुजविली. महापालिकेत भाजपचे दोन अंकी नगरसेवक निवडून आणले होते. लांडगे घराण्याचा राजकीय वारस म्हणून रवि पुढे आले. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत रवि लांडगे हे भाजपचे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले होते. रवि लांडगे व त्यांचे कुटुंबीय हे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपचे सर्वात जुने निष्ठावान म्हणून ओळखले जाते.
500 गाड्यांसह मुंबईकडे रवाना होणार
उद्या 20 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मुंबईत मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. रवि हे मंगळवारी सकाळी 500 गाड्यांसह मुंबईकडे रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले. रवि लांडगे हे भोसरीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.
भोसरीची जागा कोणाला मिळणार?
दरम्यान, भाजपचा राजीनामा दिलेले भोसरीचे माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. रवी लांडगे विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असून राऊत यांची भेट झाल्यापासून भोसरीतील राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे शहरात वाहू लागले आहे. यंदाची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होणार आहे. शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देत आहे, याबाबत शहरात उत्सुकता निर्माण झाली आहे.
शहरातील तीन विधानसभा मतदारसंघातून भोसरीची जागा कोणाला मिळणार? त्याची उत्सुकता अधिकच वाढली आहे. कारण या जागेवरून शिवसेनेने निवडणूक लढवली आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्ष राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील भोसरीची जागा पवार गटाकडे जाणार असल्याची चर्चा असतानाच आता विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले रवी लांडगे यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या