Mahayuti Clash: महायुतीत राडा, जगदीश मुळीक संतापून म्हणाले, ए मिटकरी देवेंद्र फडणवीसांना खुलासा मागण्याची तुझी पात्रता आहे का?
Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये वाद. रामदास कदमांची रवींद्र चव्हाणांवर टीका. जगदीश मुळीक अजितदादा गटाच्या अमोल मिटकरी यांच्यावर बरसले, शेलक्या भाषेत केला उद्धार. आता पुढे काय होणार?
पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिन्ही नेते राज्यभरात फिरुन राज्य सरकारच्या योजनांचा जोरदार प्रचार करत असताना स्थानिक पातळीवर मात्र महायुतीच्या नेत्यांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसत आहे. कारण, महायुतीमधील पक्षांचे काही नेते एकमेकांवर घणाघाती टीका करत आहेत. जनसन्मान यात्रेवेळी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे अजित पवार यांच्या ताफ्याला भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते. यावर संतापलेल्या अमोल मिटकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या या कृतीवरुन थेट देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला होता. यावर पुण्यातील भाजपचे नेते जगदीश मुळीक यांनी आक्रमक होत अमोल मिटकरी यांना चांगलेच फैलावर घेतले.
जगदीश मुळीक यांनी शेलक्या शब्दांमध्ये अमोल मिटकरी यांना लक्ष्य केले. मिटकरी यांनी अजित पवार यांच्या ताफ्याला भाजपच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवल्याच्या कृतीबद्दल ट्विट करुन देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहीरपणे खुलासा मागितला होता. यावर जगदीश मुळीक यांनी प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना चांगलेच खडसावले. ए मिटकरी, तुझी पात्रता आहे का? मा. देवेंद्रजींना खुलासा मागण्याची? शेवटी तू बाजारु विचारजंतच, तुझी पात्रता तेवढ्याच डबक्यात राहणार, अशी टीका जगदीश मुळीक यांनी केली. यावर आता अजितदादा गट आणि अमोल मिटकरी काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.
नेमकं काय घडलं?
उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Ajit Pawar) जनसन्मान यात्रा रविवारी जुन्नर विधानसभेतील नारायणगाव असताना भाजपच्या जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचके काळी साडी परिधान करून रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी थेट अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. आशा बुचके यांनी अजित पवारांना थेट लक्ष्य केले होते. जुन्नरमध्ये शासकीय बैठक पार पडत असताना आम्हाला का डावलण्यात आले? याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो का नाहीत? पालकमंत्री म्हणून फक्त अजित पवारांचा फोटो का लावण्यात आला आहे? अशा प्रश्नांची सरबत्ती आशा बुचके यांनी केली होती. आशा बुचके या अजित पवारांच्या ताफ्यासमोर अत्यंत त्वेषाने बोलत होत्या.
ए मिटकरी, तुझी पात्रता आहे का? मा. देवेंद्रजींना खुलासा मागण्याची?
— Jagdish Mulik (@jagdishmulikbjp) August 18, 2024
शेवटी तू बाजारु विचारजंतच, तुझी पात्रता तेवढ्याच डबक्यात राहणार !@Dev_Fadnavis pic.twitter.com/WLnw8eeOo0
मनसे आणि अमोल मिटकरींचा राडा
काही दिवसांपूर्वी अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांना लक्ष्य करणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांना सुपारीबाज नेता म्हणून संबोधले होते. त्यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यातली शासकीय विश्रामगृहाबाहेर अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली होती. यानंतर अमोल मिटकरी आणि मनसेच्या नेत्यांमध्ये बराचकाळ वाकयुद्ध सुरु होते. कालांतराने हा वाद शमला होता. अलीकडेच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती.
सुनील तटकरेंची भाजपच्या कृतीबद्दल नाराजी
जुन्नरमध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, माझ्या जिल्ह्यातही भाजपाचे नेते, मंत्री येतात. आम्ही त्यांच्या कार्यक्रमांवर कधीही आक्षेप घेत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने कोणी महायुतीच्या एकतेला गालबोट लावण्याचं काम करत असेल तर त्याला सक्त ताकीद दिली पाहिजे, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे, असे सुनील तटकरे यांनी म्हटले होते.
आणखी वाचा