यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
नेहमीच आपल्या शरीरावर साज चढवत, शृंगार करत फिरणारे हे जोगते विविध रंगाचे आकर्षक वेशभूषा आणि लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने परिधान करुन आज यल्लमा देवीच्या यात्रेसाठी आले होते.

सोलापूर : समाजाने ज्यांना नाकारलं, झिडकारलं त्यांचाही मेळा एका यात्रेच्या निमित्ताने भरतो आणि ही मंडळी आपला उत्सव साजरा करतात. महाराष्ट्र आणि कर्नाटकसह इतर राज्यातील जग जोगत्यांचे आणि भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूर (Solapur) तालुक्यातील कासेगावच्या यल्लम्मा देवीच्या यात्रेस आजपासून सुरुवात झाली आहे. देशभरातून हजारो तृतीयपंथी जगजोगतीणी या यात्रेसाठी कासेगावात दाखल झाले आहेत. वर्षभरातून देशभरातील तृतीयपंथी एक दिवस या यात्रेत एकत्र येत असल्याने महाराष्ट्र, कर्नाटक,आंध्र, गुजरात ,मध्यप्रदेश , ओरिसा अशा राज्यातून हे हजारो जोगतीणी काल रात्री कासेगावात दाखल झाले आहेत.
नेहमीच आपल्या शरीरावर साज चढवत, शृंगार करत फिरणारे हे जोगते विविध रंगाचे आकर्षक वेशभूषा आणि लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने परिधान करुन आज यल्लमा देवीच्या यात्रेसाठी आले होते. हा त्यांचा सर्वात मोठा उत्सव असतो. देशाच्या कानाकोपऱ्यात वर्षभर मागून जीवन जगणारी हि मंडळी या यात्रेच्या निमित्ताने आपल्या अंगावर सर्व प्रकारचे दागिने घालून डोक्यावर देवीचे मुखवटे घेऊन येथे यल्लमा देवीच्या दर्शनाला येत असतात.आज यात्रेचा मुख्य दिवस असल्याने दुपारी गावाचे मानकरी वसंत नाना देशमुख यांच्या वाड्यातून सवाद्य देवीचा नैवेध यल्लम्मा देवीच्या मंदिरात आणण्यात आला. यावेळी मानकऱ्यांच्या कमरेला परंपरेप्रमाणे लिंबाचे फाटे गुंडाळून त्यांना वाजत गाजत मंदिरात आणण्यात आले. आज या यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी देखील आपल्या नवसपूर्तीसाठी लिंब बांधून देवीचे दर्शन घेतले.
कासेगाव येथील या यात्रेला 100 वर्षांपूर्वीपासूनची परंपरा असून प्रामुख्यानं तृतीयपंथीयांची यात्रा म्हणून या यात्रेची ओळख आहे. यल्लमा देवीची कर्नाटक मधील सौदंती, कोकटनूर, जत याठिकाणी देवस्थाने आहेत. वर्षभर मागून जगणारा हा समाज या यात्रेसाठी मात्र देशभरातून 3 दिवस एकत्र येत असतो. त्यामुळे, येथील यात्रेला वेगळं महत्त्व आहे. समाजाने झिडकारलेल्या आणि नाकारलेल्या तृतीयपंथीयांचा मेळाच जणू या यात्रेच्या माध्यमातून भरला जातो.























