माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
अकोल्यात ऐन महापालिका निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. अकोल्यात भाजपचे बंडखोर एकत्र येत महापालिका निवडणुकीत एक नवी आघाडी उभारणार आहेत.
Akola : अकोल्यात ऐन महापालिका निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. अकोल्यात भाजपचे बंडखोर एकत्र येत महापालिका निवडणुकीत एक नवी आघाडी उभारणार आहेत. हे सर्व बंडखोर भाजपचे माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे समर्थक आहेत. अकोला भाजपात संजय धोत्रे, पक्षाचे विधानसभेतील मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांचा एक गट आहे. तर डॉ. रणजीत पाटील यांचा दुसरा गट आहे. भाजपने बंडखोरांची नवी आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. डॉ. रणजीत पाटील यांचे पुतणे आणि सलग दोनदा नगरसेवक राहिलेले आशिष पवित्रकार यांनी पुढाकार घेतला आहे.
आशिष पवित्रकार यांच्यासोबत अकोल्याचे माजी नगराध्यक्ष आणि जेष्ठ नगरसेवक हरीष आलिमचंदानी आणि माजी महानगरप्रमुख डॉ. अशोक ओळंबे हेसुद्धा नव्या आघाडीत आहेत. आज नवी आघाडी स्थापन करण्यावर चर्चा करण्यासाठी या नेत्यांनी शहरातील 'बंधन लॉन'मध्ये सहविचार सभा घेतलीय. या सभेला भाजपातील अनेक नाराज नेते आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
भाजपाचे शहरातील ज्येष्ठ नेते हरीश आलिमचंदानी यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करीत अपक्ष म्हणून 21 हजारांवर मतं घेतली होती. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपाचे अधिकृत उमेदवार असलेल्या विजय अग्रवाल यांचा फक्त 1283 मतांनी पराभव झाला होता. यासोबतच भाजपाचे माजी महानगराध्यक्ष डॉ अशोक ओळंबे यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल करीत 2100 मतं घेतली होतीय. यानंतर पक्षाने डॉ. रणजीत पाटील गटाचे समजल्या जाणाऱ्या नगरसेवक हरीश आलिमचंदानी, डॉ. रणजीत पाटील यांचे पुतणे आशिष पवित्रकार आणि माजी महानगर अध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. भाजपचे हे सर्व नाराज आणि बंडखोर असलेले नेते एकत्र येऊन भाजपला अडचणीत आणण्याची शक्यता आहे. लवकरच या आघाडीचं नाव आणि स्वरूप स्पष्ट होणार आहे.
29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर
महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचं देखील निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच उमेदवारांना निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात प्रमापत्र सादर करणं बंधनकारक असणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. 29 महापालिकेमधील 2869 जागांसाठी मतदान होणार आहे.
23 डिसेंबरपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार
अर्ज स्वीकारणे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर, अर्जाची छाननी 31 डिसेंबर, उमेदवारी माघार घेण्याची मुदत 2 जानेवारी 2026, निवडणूक चिन्ह वाटप, अंतिम उमेदवार यादी 3 जानेवारी, मतदान दिनांक 15 जानेवारी 2026, मतमोजणी 16 जानेवारी 2026 दरम्यान मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येत होता, जोपर्यंत मतदार याद्यांमधील घोळ दूर होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये, अशी मागणीही करण्यात येत होती, मात्र आता राज्यात महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.






















