पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक निर्णय समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केली असून मुंबईत किमान 50 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी पूर्ण झालीय.

पुणे : राज्यातील महापालिका (Pune) निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी वेगवान हालचाली सुरू केल्या असून महायुती व महाविकास आघाडी एकत्र राहणार का याची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. शिवसेना आणि भाजपा महायुती म्हणून ही निवडणूक लढवेल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. तर, दुसरीकडे अजित पवारांच्या (Ajit pawar) राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. महायुतीसोबत किंवा महायुतीशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) निवडणुका लढण्याची तयारी पूर्ण केली आहे. त्यातच, पिंपरी चिंचवड निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तुषार कामठे यांनी अजित पवारांची भेट घेऊन चर्चा केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक निर्णय समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केली असून मुंबईत किमान 50 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी पूर्ण झालीय. मात्र, महापालिका निवडणुकांसाठी महायुतीत राहायचे की नाही हा निर्णय अजित पवार घेणार असल्याची माहिती आहे. त्यातच, दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे आणि अजित पवार यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाली असून आज पिंपरी चिंचवडमधील अनेक इच्छुकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केले आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी ने एकत्र लढावी, यासंदर्भात कामठे यांनी अजित पवारांना निवेदन दिल्याचे समजते. त्यामुळे, पिंपरी चिंचवडसाठी अजित पवार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. पुण्यातील तब्बल 12 तासांच्या बैठका संपवून अजित पवार एका लग्न समारंभाला गेले आणि तिथून मुंबईला जाणार आहेत.
महापालिका निवडणूक लढताना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आम्हाला दिले होते. त्यामध्ये जे शिव शाहू फुले आंबेडकर विचारांचे पक्ष आहेत, जे भाजप विरोधात निवडणूक लढू शकतात अशा संघटनांना आणि पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवावी. या मागणीला पुढे घेऊन निवडणूक लढवण्यासाठी आमच्या शहराचा जो प्रस्ताव होता तो घेऊन मी आज अजित दादांकडे आलो होतो, असे तुषार कामठे यांनी अजित पवारांच्या भेटीनंतर म्हटले.
एकत्र येण्यासंदर्भात चर्चा
महानगरपालिका निवडणूक आपण सोबत लढली तर भ्रष्टाचारी भाजपला थांबवू शकतो हा आमचा प्रस्ताव मी दादांना दिला आहे. मला कोणाचाही निरोप नव्हता, प्रदेशवरून तसे काही आम्हाला आदेशही नाहीत. स्थानिक पातळीवर तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या असे आदेश आम्हाला दिलेले आहेत. कालच देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलं होतं की, ते आणि राष्ट्रवादी सोबत लढणार नाहीत. म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या मार्फत प्रस्ताव घेऊन त्यांच्याकडे आलो होतो. हा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता. दादा सकारात्मक आहेत का? असा प्रश्न विचारला असता तुषार कामठे म्हणाले दादांनी केवळ दहा मिनिटे दिली होती.
हेही वाचा
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर























