(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune : महिलेचा पुण्यातील नामांकित 12 सराफांना गंडा; हातचलाखीच्या या खेळाचा शेवट तुरुंगात
ही महिला सोन्याची अंगठी पाहण्यास मागून, ती दाखवताना हातचलाखीने खरी सोन्याची अंगठी घेऊन त्या ठिकाणी दुसरी बनावट अंगठी ठेवून निघून जात असल्याचे अनेक ठिकाणच्या फुटेजमध्ये दिसून आले.
पुणे : सराईत चोर असलेल्या महिलेने पुण्यातील नामांकित 12 सराफांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून या महिलेला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. तिच्याकडून सव्वा सहा लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. पुनम परमेश्वर देवकर (वय 42) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
हडपसर येथील चंदुकाका सराफ अँड सन्स या सराफा दुकानातून 23 नोव्हेंबर रोजी एका महिलेने लक्ष विचलित करून सोन्याची अंगठी चोरून नेली होती. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान शहरातील पु. ना. गाडगीळ, रांका ज्वेलर्स, मलबार, ब्लू स्टोन अशा नामांकित सराफा दुकानांमध्ये देखील अशा प्रकारचे गुन्हे घडले होते. त्या सर्व दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक महिला त्यामध्ये दिसून आली.
असा काढला पोलिसांनी माग
ही महिला सोन्याची अंगठी पाहण्यास मागून, ती दाखवताना हातचलाखीने खरी सोन्याची अंगठी घेऊन त्या ठिकाणी दुसरी बनावट अंगठी ठेवून निघून जात असल्याचे अनेक ठिकाणच्या फुटेजमध्ये दिसून आले. हडपसर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून या संशयित महिलेची चेहरेपट्टी, हावभाव, चालण्याची पद्धत याची सखोल माहिती घेऊन त्याद्वारे मगरपट्टा हडपसर ते बिबवेवाडी पर्यंतचे अनेक सीसीटीव्ही फुटेज पाहून ही महिला बिबवेवाडीपर्यंत गेल्याचे दिसून आले. दरम्यान गुरुवारी हडपसर पोलिसांचा तपास पथकातील पोलीस कर्मचारी सराफा दुकान परिसरात गस्त घालत असताना त्यांना संशयित महिला दिसून आली. त्यांनी या महिलेला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता ती गडबडून गेली. त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता तिने चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपी सराफा दुकानात होती कामाला
आरोपी महिला यापूर्वी अष्टेकर ज्वेलर्स या ठिकाणी सेल्समन म्हणून काम करत होती. या ठिकाणी काम करत असताना, चोरी केल्यामुळे विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी महिलेस सराफी दुकानातील कामाचा अनुभव असल्याने सोन्याचे दागिन्यावर स्टिकर कसे लावायचे याची माहिती होती. पोलिसांनी तिच्याकडून बारा चोरीच्या घटना उघडकीस आणले असून सहा लाख 23 हजार रुपये किमतीच्या 12 सोण्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या :