Pune Rain Update: घराबाहेर पडताना छत्री, रेनकोट सोबत ठेवा! पुण्याला पावसाचा अलर्ट जारी, काही भागात पावसाला सुरूवात
Pune Rain Update: पुण्यात आज हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. काही भागात पावसाला सुरूवात देखील झाली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा होणारा पुणे दौरा देखील पावसामुळे रद्द झाला आहे.
पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. परतीच्या मुसळधार पावसाचा फटका मोठ्या प्रमाणावर बसत आहे, अशातच आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा पुणे दौरा देखील पावसामुळे रद्द झाल्याची माहिती आहे. पुणे शहर परिसरात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. काल(बुधवारी) दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली, काही वेळ झालेल्या या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती, आज देखील पुण्यात मुसळधार पावसाची (Heavy Rain in Pune) शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
पुण्यासह या जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा इशारा
आज, 26 सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परतीच्या पावसाने राज्याच्या अनेक भागात जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहराला पावसाचा अलर्ट (Pune Heavy Rain) देण्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा तसेच कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात आज संध्याकाळी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी
हवामान विभागाने वर्तवलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज (गुरुवारी) पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई यांनी वादळ आणि विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा रद्द
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा आजचा पुणे दौरा रद्द (PM Modi Pune Visit) करण्यात आला आहे. आज मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार आहे. तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजनही होणार होते. मात्र मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधानांचा दौरा करण्यात आला आहे. हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. परतीच्या पावसाचा प्रचंड जोर असल्याने आणि हवामान विभागाने पुण्यात पावसाचा अलर्ट जारी केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्दा झाला आहे. येत्या काही तासांमध्ये पुण्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पंतप्रधान मोदी हे गुरुवारी पुण्यात मेट्रो आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनासाठी येणार होते. पावसाचा फटका मोदींच्या दौऱ्याला देखील बसला आहे.