Lalit Patil : ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, अटकेत असलेल्या दोन्ही पोलिसांच्या बडतर्फीचे आदेश
Pune Drug Case : नाथा काळे आणि अमित जाधव या दोन पोलिसांनी ललित पाटीलला ससुन रुग्णालयातून पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. त्यांना अटक करण्यात आली असून बडतर्फीचे आदेशही देण्यात आले आहेत.
पुणे : ललित पाटील प्रकरणात (Lalit Patil Drug Case) पुणे पोलीस दलातील दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. नाथा काळे आणि अमित जाधव असं या दोघांचं नाव असून हे दोघेही सध्या अटकेत आहेत. ललित पाटील याला ससुन रुग्णालयातून (Sasoon Hospital Drug Case) पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप या दोघांवर असून त्यांच्या बडतर्फीचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी काढले आहेत.
पुण्यातील ड्रग माफीया ललित पाटील ससुन रुग्णालयातून 1 ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. तेव्हा नाथा काळे आणि अमित जाधव हे दोन पोलीस कॉन्स्टेबल ससुन रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या 16 नंबर वॉर्ड बाहेर पहारा देत होते. कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक करण्यात आली. त्यानंतर आता त्यांच्या बडतर्फीचे आदेश काढण्यात आले आहेत.
ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर पदमुक्त, चौकशीचे आदेश जारी
ललित पाटील प्रकरणात दोषी आढळलेल्या ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना पदमुक्त करुन त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. तर आर्थोपेडीक सर्जन डॉक्टर प्रविण देवकाते चौकशी यांच निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र मॅटचा निकाल विरोधात गेल्याने डॉक्टर संजीव ठाकूर पदमुक्त होणार हे स्पष्ट झालेल असताना त्यांना पुन्हा पदमुक्त करण्याचा मंत्री हसन मुश्रीफ यांचा आदेश म्हणजे धुळफेक असल्याच विरोधकांनी म्हटले आहे. चौकशी समितीला दोषी आढळलेल्या या दोन्ही डॉक्टरांवर पोलीस काय कारवाई करतात याकडे सगळ्यांच लक्ष असणार आहे.
ड्रग माफिया ललित पाटीलला मदत केल्याचा ज्यांचावर आरोप होत होता ते ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चार सदस्यीय वैद्यकीय समितीनं दोषी ठरवलय. या समितीच्या अहवालानुसार ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी त्याला डॉक्टर ठाकूर यांची मदत होत होती. डॉक्टर ठाकूर यांच्या सांगण्यावरून डॉक्टर प्रवीण देवकाते हे ललित पाटील आजारी असल्याचे खोटे रिपोर्ट तयार करत होते. या दोन्ही डॉक्टरांचे हे कृत्य वैद्यकीय करताना डॉक्टर घेत असलेल्या शपथेला आणि वैद्यकीय व्यवसायाला अनुसरून नव्हते.
डॉक्टर संजीव ठाकूर ससून रुग्णालयाचे डीन दहा महिन्यांपूर्वी रुजू झाले. ललित पाटील ससून रुग्णालयात डिसेंबर 2020 पासून ठाण मांडून होता. त्यामुळे डॉक्टर ठाकूर यांच्या आधीच डीन आणि अधिकार्यांची चौकशी होण्याची गरज आहे. मात्र डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावरची ही कारवाई म्हणजे धूळफेक असल्याच आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
ससूनचे डीन पदी डॉक्टर ठाकूर यांची नियुक्ती करण्यासाठी ससुनचे आधीचे डीन डॉक्टर विनायक काळे यांची मुदती आधी बदली करण्यात आली होती. या निर्णयाच्या विरोधात डॉक्टर काळे यांनी मॅटमधे दाद मागितली होती. मॅटने शुक्रवारी डॉक्टर विनायक काळे यांच्या बाजूने निकाल देताना डॉक्टर संजीव ठाकूर यांना तात्काळ पदमुक्त करण्याचे आदेश दिले . त्यानंतर थोड्याच वेळात वैद्यकीय शिक्षण विभागाने डॉक्टर ठाकूर यांना पदमुक्त करण्याचे आदेश दिले.
ही बातमी वाचा: