Barack Obama Pasaydan Special Reportमाऊलींच्या पसायदानाची ओबामांना भुरळ,सोशल मीडियावर प्लेलिस्ट शेअर
Barack Obama Pasaydan Special Report : माऊलींच्या पसायदानाची बराक ओबामांनाही भुरळ, सोशल मीडियावर टाकली प्लेलिस्ट
संत ज्ञानेश्वरांनी विश्वशांतीसाठी केलेली प्रार्थना अर्थात पसायदान. प्रत्येक मराठी माणसाच्या मनामनात घर केलेल्या या पसायदानानं आता थेट बराक ओबामांना भुरळ घातलीय. ओबामांनी आपल्या आवडत्या रचनांची एक यादी सोशल मीडियावर जाहीर केली. त्यात पसायदानाचा उल्लेख पाहून सर्वांनाच आनंदाचा सुखद धक्का बसला. ओबामांच्या मनी पसायदानानं ही रुंजी कशी घातली, पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून.
आता विश्वात्मके देवे, या शब्दांपासून सुरु होणारं संत ज्ञानेश्वरांचं पसायदान खऱ्या अर्थानं संपूर्ण विश्वाला साद घालणारं असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी त्यांच्या आवडत्या रचनांची यादी जाहीर केली. या यादीत संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा उल्लेख पाहून सर्वांनाच आनंदाचा सुखद धक्का बसला. प्रत्येक भारतीयाच्या कानात गेल्या काही दशकांपासून पसायदान रुंजी घालतं ते भारतरत्न लतादिदींच्या दैवी सूरांच्या साथीनं.
बराक ओबामांच्या कानी पसायदानाचे हे सूर पोहोचले अमेरिकी गायक गणव्यच्या सूरांमधून. भूता परस्परे जडो मैत्र जिवांचे, या माऊलींच्या ओळींनुसार गायक गणव्य यांच्या स्वरांच्या माध्यमातून माऊलींच्या पसायदानाशी ओबामांचं असं मैत्र जुळलं.
वास्तविक,बराकओबामा आणि भारतीय संस्कृतीचा संबंध अगदीच जवळचा आहे. भारत दौऱ्यावर आले असताना इथल्या कोळीगीतांवर पत्नी मिशेलसोबत ठेका धरणारे ओबामा आजही सगळ्यांच्या स्मरणात आहेत. भारतीय संगीत ऐकण्यासाठी कान तयार झालेल्या ओबामांना आता संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानानंही भुरळ घातली, ती त्यातल्या वैश्विक जाणीवेमुळेच.
आपल्या राजकीय कारकिर्दीवर आणि विचारसरणीवर भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधींचा प्रभाव असल्याचं बराक ओबामांनी यापूर्वी अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवलंय. गांधींच्या सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांनी ओबामांना प्रभावित केलंय.
All Shows

































