अंतिम वर्षाच्या परीक्षा होतीलच, पण विद्यार्थ्यांसमोर आता सगळ्यात मोठा प्रश्न कोणता आहे?
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारला राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्याच लागतील हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता परीक्षा होणार आहेत, पण विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न उभे आहेत.
पुणे : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्याच लागतील हे स्पष्ट झालं आहे. त्यासाठी सुप्रीम कोर्टाने डेडलाईनही आखून दिली आहे. परीक्षा होणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता परीक्षा घ्यायची कशी असा प्रश्न प्रशासन आणि विद्यापिठांसमोर आहे. तर दुसरीकडे परीक्षेच्या आधी पण परीक्षेच्याच संदर्भातले काही मोठे विद्यार्थ्यांसमोर ऊभे राहिले आहेत.
"विद्यार्थ्यांना सेंटरवर एकत्र न बोलावता, घरुनच परीक्षा देता येईल असं आश्वासन विद्यापिठांकडून देण्यात आल्याने विद्यार्थी थोडे रिलॅक्स झाले आहेत. पण दुसरा मोठा प्रश्न हा पुस्तकांचा निर्माण झाला आहे. अभ्यास करणार कसा?" असा प्रश्न स्टूडंट वेल्फेअर असोसिएशनकडून वैभव एडके यांनी विचारला.
परीक्षा कधीही झाली आणि कशीही झाली तरी अभ्यास कसा करायचा हा प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावतो आहे. देशात लॉकडाऊन सुरु होण्याआधीच पुण्यातले कॉलेजेस बंद झाले होते. मिळेल त्या साधनानं बहुतांश विद्यार्थी आपआपल्या गावी परतले. तेव्हा परिस्थिती अशी बिघडत जाईल अशी कल्पनाही त्यांनी केली नव्हती.
"बहुतांश विद्यार्थी हे 31 मार्चपर्यंत घरी राहायचं या तयारीनंच घरी गेले होते. त्यामुळे अभ्यासाची साधनं विद्यार्थ्यांजवळ नाहीयेत. नोट्स, पुस्तकं हे रुमवर किंवा हॉस्टेलवर आहेत. आता परीक्षा होणार पण या साहित्याशिवाय अभ्यास कसा करणार?" असं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी कमलाकर शेटे याने सांगितलं.
परीक्षा होणार हे स्पष्ट झालं असताना पेपरचा फॉर्मट कसा असणार यावरुनही विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहेत. जर एमसीक्यू फॉर्म्याटमध्ये परीक्षा घेतली तर जास्त विद्यार्थी नापास होतील अशी भीती विद्यार्थ्यांना वाटते आहे.
"सविस्तर उत्तरं लिहीताना 5 मार्कांचा प्रश्न असेल तरीही 2-3 मार्क मिळू शकतात. पण एमसीक्यूमध्ये एक जरी उत्तर चुकलं तरीही तो मार्क जाणार. विद्यार्थ्यांकडे अभ्यासाचं साहित्य नाहीये. त्यामुळे जास्त विद्यार्थी नापास होण्याची भिती आहे.", असं कमलाकर शेटे याने सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या :
सोप्या पद्धतीने परीक्षा घेण्याच्या निर्णयावर राज्यपाल सकारात्मक : उदय सामंत
उच्च शिक्षित बेरोजगारांचं राज्यव्यापी डिग्री जलाओ आंदोलन, शिक्षकदिनी भक्षक दिन साजरा!