पुण्यात हेल्मेट सक्तीविरोधात घंटानाद आंदोलन
महात्मा फुले मंडई येथील टिळक पुतळ्यासमोरील या आंदोलनात राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि गणेश मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. हेल्मेटसक्ती मागे न घेतल्यास पुणे बंदची हाक देण्यात येईल असा इशारा हेल्मेटसक्ती विरोधी कृतीसमितीने दिला आहे.
पुणे : पुण्यात हेल्मेटसक्ती प्रभावीपणे राबविली जात असताना दुसरीकडे या हेल्मेटसक्तीला विरोध सुरुच आहे. हेल्मेट सक्तीविरोधी कृती समितीने आज घंटानाद आंदोलन करत लक्ष वेधून घेतलं.
महात्मा फुले मंडई येथील टिळक पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि गणेश मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हेल्मेटसक्ती मागे न घेतल्यास पुणे बंदची हाक देण्यात येईल, असा इशाराही हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीने यावेळी दिला आहे.
हेल्मेटसक्ती हा कोर्टाचा निर्णय आहे. कोर्टाच्या निर्णयाविरोधात आपण जाऊ शकत नाही. कोर्टाचा निर्णय हा कायदा असतो. त्यामुळे यावर अधिक चर्चा न करता पुणेकरांनी स्वतःच्या हितासाठी योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहन गिरीश बापट यांनी याआधी केलं आहे.
तसेच हेल्मेट नसलेल्या नागरिकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करताना दंड आकारु नये, त्याऐवजी पोलिसांनी व्यावहारिक मार्ग अवलंबायला हवा, असंही गिरीश बापट म्हणाले होते.
पुणे शहरात 1 जानेवारीपासून दुचाकी चालकांना हेल्मेटसक्ती लागू झाली आहे. मात्र हेल्मेटसक्तीला पुणेकर आणि विविध संघटना कडाडून विरोध करत आहेत. मात्र हा विरोध डावलून पोलिसांनी कारवाई सुरुच ठेवली आहे.