पुण्यात मोठ्या प्रमाणात पाणी कपातीची शक्यता
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आणि पुण्याचे आयुक्त सौरभ राव यांच्यामध्ये आज सिंचन भवनमध्ये तातडीची बैठक होणार आहे.
पुणे : पुणे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी कपात होण्याची शक्यता आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आणि पुण्याचे आयुक्त सौरभ राव यांच्यामध्ये आज सिंचन भवनमध्ये तातडीची बैठक होणार आहे. या बैठकीत पाणीकपातीचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बैठकीत पाणीकपातीचा निर्णय झाल्यास पुणे शहराला एक दिवसाआड पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते. पुण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानंतर ही बैठक होत आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमधे कमी पाणी शिल्लक आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने महापालिकेला यापुढे दररोज 1100 एमएलडी एवढेच पाणी द्यायचे ठरवले आहे.
मात्र पुणे महापालिकेकडून या कराराचा भंग करुन दररोज 1350 एमएलडी पाणी उचलले जाते. यापुढेही तेवढेच पाणी उचलण्याची परवानगी मिळावी, यासाठी महापालिकेने जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे अर्ज केला होता. मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागालाही पाणी देणे गरजेचे असल्याने महापालिकेचा अर्ज फेटाळला.
त्यामुळे आजच्या जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांमधील बैठकीत पाणीकपातीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यामुळे पुण्यावर एक दिवसाआड पाणी घेण्याची वेळ देखील येऊ शकते.