Shivajirao Adhalarao Patil: राष्ट्रवादीचे आढळराव पाटील नाराज? जनसन्मान यात्रेसह लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाकडे फिरवली पाठ, चर्चेला उधाण
Shivajirao Adhalarao Patil: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमाला शिवाजीराव आढळराव पाटील गैरहजेर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून राज्यात जनसन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या निमित्ताने पक्षाने आपल्या मतदारसंघात तयारी केली आहे. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
अजित पवार गटात आढळरावपाटील नाराज?
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमाला शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) गैरहजेर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाकडे देखील आढळराव पाटलांनी पाठ फिरवल्याची चर्चा आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात पराभवानंतर काही आमदार विचारात घेत नसल्याची खंत यापूर्वी आढळराव पाटलांनी व्यक्त केली होती.आजपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जनसन्मान यात्रा शिरुर लोकसभा मतदारसंघात असून पहिल्याच दिवशी आढळराव पाटलांची (Shivajirao Adhalarao Patil) गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली आहे
शिवाजीराव आढळराव पाटलांचा लोकसभेसाठी अजित पवार गटात प्रवेश
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी (२६ मार्च) रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. आढळराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर शिरूरची लोकसभा निवडणूक लढवली.
आढळराव पाटलांनी शिवसेना का सोडली?
लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीच्या नेत्यांची जागावाटपाची चर्चेवेळी अजित पवारांनी शिरूरच्या जागेवर दावा सांगितला. शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील हे या जागेसाठी आग्रही होते. ते या मतदारसंघाचे माजी खासदार होते. त्यांची या मतदारसंघात ताकद आहे. त्यामुळे सेनेला ही जागा मिळावी, अशी मागणी होती. मात्र, महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला सुटली त्यानंतर आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी घड्याळ चिन्हावरही निवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला.
आढळराव पाटलांचा लोकसभा निवडणुकीत पराभव
शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचे उमेदवार राहिलेले डॉ. अमोल कोल्हे हे सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांचा साधारण 1 लाख 40 हजार 951 मतांनी पराभव केला आहे.