Pune gym trainer robbery : लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, जिम ट्रेनर बनला चोर
Pune Gym Trainer Robbery : लॉकडाऊनचा परिणाम अनेकांच्या आयुष्यावर झाला आहे. काहींना नोकरी गमवाव्या लागल्या तर काहींचे उद्योग व्यवसाय बंद पडले. यातून काहीजण गुन्हेगारीकडे वळले
Pune Gym Trainer Robbery : लॉकडाऊनचा परिणाम अनेकांच्या आयुष्यावर झाला आहे. काहींना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या तर काहींचे उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. यातून आलेल्या नैराश्यातून काही जणांनी आत्महत्या केल्या आहेत तर काहीजण गुन्हेगारीकडे वळले आहेत. पुण्यातही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. लॉकडाऊन काळात नोकरी गेल्यानंतर एका जिम ट्रेनरने पत्नीच्या मदतीने चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. बाळासाहेब प्रदीप कुमार हांडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात 30 नोव्हेंबरला एका सराफाच्या दुकानातून मंगळसूत्र चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी एका दुचाकीवर जाताना दिसला. दुचाकीच्या आधारे पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली. आरोपी बाळासाहेब हांडे हा 30 नोव्हेंबर रोजी पत्नीला घेऊन परमार ज्वेलर्स मध्ये आला होता. यावेळी त्यांनी दागिने विकत घेण्याच्या बहाण्याने एक लाख बावीस हजार रुपयाचे मंगळसूत्र चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. दुकानांमध्ये चोरी करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्याआधारावर पोलिसांनी कारवाई केली.
बाळासाहेब हांडे हा एका जिममध्ये ट्रेनिंग देण्याचे काम करत होता. कोरोना महामारीनंतर राज्यात लॉकडाऊन लागले आणि जिम बंद पडली. त्यानंतर उत्पन्नाचे कुठलेही साधन नसल्याने त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. चोरी करण्यासाठी त्याने पत्नीलाही सोबत नेले होते. त्यानंतर सेल्समनचे लक्ष दुसरीकडे विचलित करून त्याने मंगळसूत्राची चोरी केली आहे. दरम्यान, लॉकडाऊननंतर नोकरी गेल्याने उद्योग व्यवसाय बंद पडल्याने आणि त्यांनी नव्याने उभारी घेतली. जमेल ते व्यवसाय केले.. नोकरी केली आणि पगार या संकटातून मार्ग काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले.. परंतु बाळासाहेब हांडे सारख्यांनी काही चुकीचे मार्ग अवलंबले आणि गजाआड गेले आणि त्यांचे कुटुंबीयही आता अडचणीत आलेत, कारण त्यांना कोर्टाचे खेटे करावे लागतात.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live