(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुणे दौऱ्यात मुख्यमंत्र्यांकडून डॉ. प्रकाश आमटे यांची भेट, रुग्णालयात जाऊन प्रकृतीची विचारपूस
CM Eknath Shinde Meets Dr.Prakash Amte : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन डॉ. प्रकाश आमटे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. डॉ. आमटे हे सध्या रक्ताच्या कर्करोगाने आजारी आहेत.
CM Eknath Shinde Meets Dr.Prakash Amte : पुणे (Pune) दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल (2 ऑगस्ट) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन डॉ. प्रकाश आमटे (Dr.Prakash Amte) यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. डॉ. आमटे हे सध्या रक्ताच्या कर्करोगाने आजारी असून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) पुढील उपचार घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांना समजले. पुणे दौरा आटोपून रात्री त्यांनी डॉ.आमटे यांना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. प्रकृती साथ देत नसली असली तरीही या आजाराला सकारात्मकरित्या तोंड देण्याची त्यांची जिद्द आणि या परिस्थितीत देखील आयुष्य समृद्धपणे जगण्याची इच्छा त्यांच्या देहबोलीतून जाणवली.
या भेटीनंतर त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे, पुत्र डॉ. कौस्तुभ आमटे आणि इतर कुटुंबियांशी बोलून त्यांनी प्रकाश आमटे यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांची माहिती घेतली. यावेळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रमुख डॉक्टर देखील उपस्थित होते.
Prakash Amte News: डॉ. प्रकाश आमटे पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल; अनिकेत आमटेंची माहिती
डॉ. प्रकाश आमटे यांना कर्करोगाचं निदान
डॉ. आमटे यांना यांना हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सरचं निदान झालं आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉ. प्रकाश आमटे हे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. 23 डिसेंबर 1973 पासून ते, त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा इथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात. तसंच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात. डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आणि कार्यावर 'डॉ.प्रकाश आमटे: द रिअल हीरो' हा चित्रपट 10 ऑक्टोबर 2014 रोजी प्रदर्शित करण्यात आला होता.
यासोबतच भाजपचे नेते पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी देखील याच रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल आहेत. त्यांची देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी आमदार उदय सामंत, माजी आमदार विजय शिवतारे आणि आमटे कुटुंबीय उपस्थित होते.