Pune Crime News : भर रस्त्यात सपासप वार करुन हत्या; अखेर 36 तासांत पोलिसांनी केला हत्येचा उलगडा, नेमकं काय आहे कारण?
विजय ढूमेचा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याचं समोर आलं आहे. सिंहगड रोड पोलिसांकडून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. महिलेच्या प्रियकराकडून विजयवर लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आला होता.

पुणे : विसर्जन मिरवणुकीनंतर पुण्यात हत्येचा (Pune Murder) थरार घडला. सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा आणि अनेक नेत्यांच्या ओळखीचा असलेल्या विजय ढुमे यांची बांधकामाच्या लोखंडी सळई आणि भरीव लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून हत्या करण्यात आली. आता विजय ढुमे याच्या खुनाचा उलगडा करण्यात पुणे शहर पोलिसांना अखेर यश मिळाले आहे. ढूमेचा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याचं समोर आलं आहे. सिंहगड रोड पोलिसांकडून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. महिलेच्या प्रियकराकडून विजयचा हॉटेलच्या पार्किंगमध्ये लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आला होता.
या प्रकरणी सुजाता समीर ढमाल (रा. किरकिटवाडी, नांदोशी रोड, पुणे), संदीप दशरथ तुपे (27, रा. मु.पो. कांदलगाव, ता. इंदापुर, जि. पुणे), सागर संजय तुपसुंदर, प्रथमेश रामदास खंदारे (18, रा. आंबेकर हॉटेल जवळ, उंड्री-पिसोळी, पुणे) आणि एका अल्पवयीन साथीदारास सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिंहगड रोड पोलिसांनी परिसरातील जवळपास 60 ते 70 सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. त्यावरून आणि मयत विजय ढुमेचे जुने प्रेमसंबंध असणारी महिला सुजाता ढमाल हिच्याकडेदेखील तपास केला होता. त्यावेळी सुजाताच्या नव्या प्रियकराने त्याच्या साथीदारांना सोबत घेत विजय ढुमेची हत्या केल्याचं समोर आलं.
हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद
सिंहगड क्वॉलिटी लॉजमधून खाली उतरल्यानंतर बाहेर पडत असताना चार ते पाच हल्लेखोरांनी विजय ढुमे यांच्यावर अचानकपणे हल्ला केला होता. हा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झाला होता. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे सध्या पुणे शहरात चांगलीच खळबळ उडाली होती.
भररस्त्यात होणाऱ्या या प्रकारामुळे अनेकांच्या मनात धडकी...
पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याचं दिसत आहे. कोयता गॅंग आणि क्षृल्लक वादातून या घटना पुढे येतात. मात्र या घटनेमुळे पुणे शहरात भीतीचं वातावरण निर्माण होतं. कोयता गॅंगचे हल्ले संपायचं नाव घेत नाही आहे. त्यात अशा घटना पुढे आल्याने पोलिसांवरचादेकील ताण वाढतो. पुणे पोलिसांनी पुण्यात गुन्हेगारी थांबवण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. मात्र तरीही या गुन्हेगारीला आळा बसत नसल्याचं चित्र आहे. भररस्त्यात होणाऱ्या या प्रकारामुळे अनेकांच्या मनात धडकी भरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
