कोरोनानंतर 'प्लॅस्टिक टोमॅटो' व्हायरस हल्ला, शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं
लॉकडाऊनने (Lockdown) आणि आता प्लॅस्टिक टोमॅटो (Plastic Tomato) व्हायरसने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. शिवाय या व्हायरसला नामशेष करण्यासाठी नेमक्या औषधाची निर्मिती ही अद्याप झालेली नाही.

मुंबई : कोरोना व्हायरसने (Corona Virus) त्रस्त असलेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर आता आणखी एका व्हायरसने हल्ला केला आहे. या व्हायरसमुळं शेतात 'प्लॅस्टिक टोमॅटो' (Plastic Tomato) उगवल्याचं शेतकरी सांगत आहेत. दुसरीकडे कृषी विज्ञान शाखेतील तज्ञांना देखील यावर नेमका उपाय सापडेना. त्यामुळं शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय.
'प्लॅस्टिक टोमॅटो' हा टोमॅटोचा कोणता प्रकार नाही. तर हा एक व्हायरस आहे. जो टोमॅटोवर बुरशीसारखा पसरतो अन त्यावर प्लॅस्टिक सारखं आवरण आणतो. लागवडीनंतर तब्बल दोन महिन्यांनी या रोगाची लागण झाल्याचं शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या व्हायरसने हिसकावला आहे. पुण्याच्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात एकतीशे हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी टोमॅटोची लागवड होते. पैकी जवळपास दीडशे हेक्टरवर हा व्हायरस पसरलाय. पाच ते सहा व्हायरसचं हे मिश्रण असल्याचं पंचनाम्यात दिसून येतंय.
कृषी विज्ञान केंद्राने या प्लॅस्टिक टोमॅटोचे नमुने बेंगलोरच्या आयआयएचआर संस्थेकडे पाठविले आहेत. मात्र अद्याप हा व्हायरस कोणता आणि तो कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करायला हव्यात. हे अस्पष्ट आहे. कोरोनामुळं टोमॅटोला या व्हायरसची लागण झाल्याची भीती काहींनी व्यक्त केली होती. पण ही अफवा असल्याचं तज्ञांनी स्पष्ट केलंय. शिवाय मानवाच्या अथवा प्राण्यांच्या खाण्यात ते आलं तरी कोणताच धोका उद्भवणार नसल्याचा दावा तज्ज्ञांनी केलाय.
अगोदर लॉकडाऊनने आणि आता प्लॅस्टिक टोमॅटो व्हायरसने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. शिवाय या व्हायरसला नामशेष करण्यासाठी नेमक्या औषधाची निर्मिती ही अद्याप झालेली नाही. त्यामुळं या शेतकऱ्यांवरील चिंतेचे ढग अधिकच दाटून आलेत.
संबंधित बातम्या :
























