Pune Accident News:मित्राला वाचवायला गेला अन् स्वत:च वाहून गेला; कुंडमळ्यातील घटना
कुंडमळा येथे विद्यार्थी फिरायला गेले असताना मित्राला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारलेला तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजकुमार जयस्वाल असे तरुणाचे नाव आहे. तर अफराज शेख हा या घटनेतून बचावला आहे.

Pune Accident News: महाविद्यालयीन विद्यार्थी कुंडमळा येथे फिरायला गेले असताना मित्राला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारलेला तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजकुमार जयस्वाल असे तरुणाचे नाव आहे. तर अफराज शेख हा या घटनेतून बचावला आहे. काही विद्यार्थी कुंड मळा येथे फिरायला गेले होते. त्यावेळी पाण्यात खेळण्याच्या आनंद लुटला. सगळे मित्र निसर्गाची मजा घेत होते. कुंडमळ्याच्या धबधब्यात खेळले मात्र शेख या तरुणाचा पाण्यात पाय घसरला. त्यावेळी शेजारी खेळत असलेल्या जयस्वाल या तरुणाने त्याचा मित्र शेखला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. दोघांनी जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र जयस्वालचे प्रयत्न असफल ठरले. शेख शेजारी दगडाला लटकून होता. त्यामुळे त्याचा जीव वाचला मात्र शेखला वाचवायला गेलेला जयस्वाल पाण्यात वाहून गेला.
या सगळ्या घटनेची माहिती मिळताच मावळ संघटनेचे बजरंग दल आणि वन्यजीव रक्षक घटनास्थळी आले. त्यांना शेखला वाचवण्यात यश आले. राजकुमारला शोधण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकेही पोहोचली. पथक व स्थानिक नागरिकांनी शोध घेतला मात्र राजकुमार सापडला नाही. रात्री अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवावी लागली. आज पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे.
कुंडमळ्यात वाहून झाल्याची ही महिनाभरातील दुसरी घटना आहे. यापुर्वी कुंडमळ्यात वर्षाविहाराचा आनंद घेत असताना वैभव देसाई हा तरुण वाहून गेला होता मात्र दोन दिवस त्यांच्या मृतदेहासाठी शोध मोहीम सुरु होती. दोन दिवसांनंतर त्याचा मृतदेह सापडला होता. नको ते धाडस करणं महागात पडलं त्यामुळे तो वाहून गेल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं होतं. मावळ वन्यजीव रक्षक पथक यांनी ही शोधमोहीम राबवली होती.
नागरीकांच्या अति उत्साहाने अपघात
पुण्याच्या आजूबाजूचा निसर्ग सौंदर्य अनुभवायला अनेक नागरीक गर्दी करतात. अनेक नागरीकांना फोटो आणि सेल्फीचा मोह आवरत नाही. अति उत्साह दाखवतात. यामुळे गडकिल्ले आणि धोकादायक ठिकाणांवरील अपघातांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. अनेक लहान मोठ्या धबधब्यामध्ये आतपर्यंत अनेकजण वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहे. त्याचबरोबर अनेकांनी जीव गमावला आहे. तरी देखील नागरीक खबरदारी घेताना दिसत नाही. धोकादायक ठिकाणी किंवा गडकिल्ल्यांवर जाताना योग्य काळजी घ्या. खबरदारी बाळगा, असं आवाहन प्रशासनाकडून कायम केलं जातं. त्याच्याकडून योग्य योजनादेखील आखली जाते मात्र नागरीकांच्या हलगर्जीपणामुळे अपघाताचं सत्र सुरुच असल्याचं चित्र आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
