Uday Samant attack In Pune: मोठी बातमी: उदय सामंत हल्ला प्रकरणी आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी; शिवसेना शहरप्रमुख संजय मोरेंचा समावेश
शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलीसांनी आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Uday Samant attack In Pune: शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे (Pune) पोलीसांनी आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीवर 252,120 ,307 ,332 या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबन थोरात, शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
उदय सामंत यांच्या ताफ्यावर काल रात्री कात्रज भागात हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी आज पोलिसांनी काही जणांना अटक करून त्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर केले होते. शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली होती. रात्रभर भारती विद्यापीठ पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड केली होती. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या 'शिवसंवाद' सभेच्या आयोजकांसह पाच जणांना अटक करण्यात आली होती. या पाच जणांना आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
काल (2 ऑगस्ट) एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्यासोबत उदय सामंत देखील होते. उदय सामंतांची गाडी पुण्यातील दगडूशेठ मंदिराकडे निघाली होती. त्याचवेळी कात्रज चौकात माजी मंत्री आदित्य ठाकरेंची देखील सभा सुरु होती. शिवसंवाद सभेच्या माध्यमातून ते संबोधित करत होते. हजारोच्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी हजर होते. उदय सामंतांची गाडी पुण्यातील दगडूशेठ मंदिराकडे जात असताना शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. दगडफेक केली. मोठ्या संख्येने शिवसैनिक एकत्र येत त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या .
आपल्या सगळ्यांच्या आशिर्वादाने मी सुखरुप आहे मला कोणतीही ईजा झाली नाही. सुभाष देसाईंचा आणि हल्ले करणाऱ्यांच्या अकलेची मला कीव करावीशी वाटते. माझ्या गाडीच्या मागे मुख्यमंत्र्यांची गाडी येण्याची शक्यता होती. त्या गाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील बंडखोर आमदार तानाजी सावंत देखील होते. मुख्यमंत्र्यांची गाडी थांबली असती तर त्यांच्यावर देखील हा हल्ला होऊ शकला असता, अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.