Pune News : घरातील हसरा चेहरा हरपला! इंदापुरात दहावीच्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू; गाव हळहळलं
दहावीच्या विद्यार्थीनीचा (Pune news) हृदयविकाराच्या तीव्र (Heart attack) झटक्याने जागीच मृत्यू झाला. रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळून मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या मुलीचा मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Pune News : पुण्यात दहावीच्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या तीव्र (Heart attack) झटक्याने जागीच मृत्यू झाला. रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळून मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या मुलीचा मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथे ही धक्कादायक घटना घडली. सृष्टी सुरेश एकाड (वय 16 रा. जाधव वस्तीजवळ, सरडेवाडी ता. इंदापूर जिल्हा पुणे) असे मृत तरुणीचे नाव आहे. दहावीच्या शेवटचा पेपर शिल्लक असताना तिचा मृत्यू झाला आहे.
इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी गावातील जाधव गावाजवळ सृष्टी एकाड ही आपल्या कुटुंबासह राहत होती. 12 मार्च रोजी तिने रंगपंचमी साजरी केली. उत्साहात रंगपंचमी खेळून झाल्यावर ती तिच्या मित्रमंडळींबरोबर गप्पा मारत बसली होती. याच दरम्यान सायंकाळी सातच्या सुमारास अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. हे पाहून सगळे मित्र घाबरले. अनेकांना काय नेमकं होत आहे हे कळलंच नाही. त्यावेळी तिला डॉक्टरांकडे नेलं. परंतु तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं. सृष्टी ही इंदापूर शहरातील नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होती. सध्या दहावीच्या परीक्षा सुरु आहेत. सोमवार 13 मार्च रोजी दहावीच्या अंतिम पेपरपूर्वी तिच्या दुःखद निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. तिच्या पश्चात आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. लेकीच्या आकस्मिक मृत्युमुळे संपूर्ण कुटुंब दु:ख व्यक्त करत आहेत.
शेवटचा पेपर शिल्लक होता...
सध्या दहावीची परीक्षा सुरु आहे. दहावीचा शेवटचा पेपर सुरु आहे. तिचा शेवचा पेपर शिल्लक होता मात्र त्यापूर्वीच तिचा असा अकस्मित मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.
हृदय जपलं पाहिजे...
खरे तर सध्या धावत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही वर्षात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कमी वयाच्या लोकांनाही हृदयविकाराचा त्रास जाणवतो. चुकीचा आहार, शारीरिक हालचाली कमी होत असल्याने हृदयविकाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. चुकीच्या सवयींमुळे हृदयाला रक्तपुरवठा करण्याऱ्या धमण्यांमध्ये ब्लॉकेज तयार होतात आणि हृदयविकाराचा त्रास वाढत जातो. त्याकडे दुर्लक्ष केल्यास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू होऊ शकतो. अलिकडे तरुणांना हृदयविकाराचा धोका वाढता असल्याचं निष्पन्न झालं आहे. विशीमध्ये आणि तिशीमध्येही तरुणांना हृदयविकार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यासाठी त्यांची चुकीच्या पद्धतीची जीवनशैली कारणीभूत आहे. बैठी जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी, धूम्रपानामुळे तरुणांमध्ये हृदयविकार वाढत आहे.