ABP C-Voter Survey: काँग्रेस अध्यक्ष कोणाला बनवले पाहिजे? जाणून घ्या सर्वेक्षणात काय म्हणाले लोक
ABP News Survey On Congress President: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. येत्या काहीच दिवसात यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
ABP News Survey On Congress President: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. येत्या काहीच दिवसात यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. काँग्रेसची ही निवडणूक पक्षासाठी खूप महत्वाची आहे. कारण या निवडणुकीतूनच हे पक्षाला पुढचा अध्यक्ष मिळणार आहे. ज्यांच्या नेतृत्वात 2024 ची निवडणूक लढवली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील 12 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. दरम्यान, काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण होणार, हा प्रश्न सर्वाधिक विचारला जात आहे. मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) आणि शशी थरूर (Shashi Tharoor) सध्या या शर्यतीत आहेत. याच राजकीय वातावरणात एबीपी न्यूज दर आठवड्याला देशाचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
एबीपी न्यूजने सी व्होटरसोबत सर्वेक्षण केले आहे. हे सर्वेक्षण बुधवार ते शुक्रवार या कालावधीत करण्यात आले आहे. सी व्होटरच्या या सर्वेक्षणात 5 हजार 291 लोकांशी संवाद साधण्यात आला आहे. सर्वेक्षणाचे निकाल पूर्णपणे लोकांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहेत. सर्वेक्षणातील एररचे मार्जिन प्लस मायन्स 3 ते प्लस मायन्स 5 टक्क्यांपर्यंत आहे.
सी व्होटरच्या या सर्वेक्षणात काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण बनले पाहिजे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यावर सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांनी आपली मते मांडली आहेत. सर्वेक्षणात 35 टक्के लोकांनी मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव घेतले आहे. तर 28 टक्के लोकांनी शशी थरूर यांच्या नावाला प्राधान्य दिलं आहे. याशिवाय 37 टक्के लोकांचे मत आहे की, काँग्रेस अध्यक्ष हा गांधी कुटुंबातील कोणीतरी असावा.
काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण व्हावा?
स्रोत- सी व्होटर
- मल्लिकार्जुन खरगे - 35%
- शशी थरूर - 28%
- गांधी कुटुंबातील कोणीतरी - 37%
दरम्यान, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचं नेतृत्व करत असलेले खासदार राहुल गांधी यांनी आधीच आपण ही निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं होत, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. त्यानंतर खासदार शशी थरूर यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. ज्याच्या काही दिवसानंतर त्यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होत. यातच मल्लिकार्जुन खरगे यांना गांधी कुटुंबीयांचं समर्थन असून त्यांनीच खरगे यांना ही निवडणूक लढवायला सांगितली असल्याची चर्चा, अद्यापही होत आहे. आता या दोन्ही नेत्यांपैकीच एका नेत्याकडे काँग्रेसची धुरा जाणार आहे. यातच काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला होणार असून 19 ऑक्टोबरला नवीन अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.