(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीच
Best Employee Bonus : भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीच
बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांना यंदाचे सानुग्रह अनुदान देण्यासाठी महापालिकेने सुमारे ८० कोटी रुपयांची रक्कम सोमवारी (ता.४) बेस्टच्या खात्यात जमा केली आहे. पण बेस्टकडुन ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी आता केंद्रीय निवडणूक आयुक्तांची परवानगी मिळण्याची प्रतीक्षा केली जात आहे. परवानगी मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांना २९ हजार सानुग्रह अनुदान देणार आहे. दरवर्षी पालिका कर्मचाऱ्यांसोबत बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही सानुग्रह अनुदान दिले जाते. यंदा मात्र भाऊबीज उलटून गेली, तरी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पदरात बोनसची भेट पडलेली नाही. निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसचा प्रश्न अधांतरी राहिला. याविरोधात रविवारी आणि सोमवारी बेस्ट कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन झाले. सोमवारी (ता.४) कुलाबा येथील बेस्ट भवनात कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी डिग्गीकर यांनी सांगितले की, 'बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानासाठी पालिकेने आजच बेस्टच्या खात्यात ८० कोटी रुपये जमा केले आहेत. सध्या आचारसंहिता असल्याने मुख्य निवडणूक आयुक्तांच्या परवानगीने सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे.