Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Milind Deora on Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी मुंबईत दाखल होणार आहे. यावरून मिलिंद देवरा यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या (Maharashtra Assembly Elections 2024) लढती स्पष्ट झाल्यानंतर आता प्रचाराचा धुराळा उडाला आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) अनेक सभांचे आयोजन केले जात आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) हे 6 नोव्हेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. मुंबई राहुल गांधी यांची प्रचार सभा होणार आहे. यावरून वरळी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मिलिंद देवरा यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटाकडून त्यांना वरळीचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. आता विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात झाली असून काँग्रेस नेते प्रचारासाठी मुंबईत दाखल होणार आहेत. यावरून मिलिंद देवरा यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधलाय.
राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...
मिलिंद देवरा म्हणाले की, उद्या काँग्रेसचे दिल्लीतील नेते मुंबईत येत आहेत. मी गेली 20 वर्ष मुंबईतल्या गणेशोत्सवासाठी या दिल्लीतील नेत्यांना बोलवत होतो. लालबाग राजा किंवा सिद्धीविनायक मंदिर दर्शनासाठी नाही तर गिरगावमधील केशवजी नाईक चाळीतील पहिल्या गणपतीच्या दर्शनासाठीही ते आले नाहीत. आता निवडणुका आहेत त्यामुळेच येत आहेत. बाकी यांना काही पडलेली नाही, असा हल्लाबोल त्यांनी राहुल गांधी यांच्यावर केलाय.
मिलिंद देवरांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
मिलिंद देवरा यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलंय की, वरळीच्या मतदारांना आदित्य ठाकरेंनी नाराज केलं, वरळीकरांना आदीत्य ठाकरेंनी खोटी स्वप्न फक्त दाखवली. त्यांचे वडिल मुख्यमंत्री होते, ते स्वत: मंत्री सोबत दोन परिषदेचे आमदार, दोन माजी महापौर असताना वरळीतील नागरिकांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. अनेक पुर्नविकासाचे प्रकल्प रखडलेले आहे. खर सांगायचं तर आदित्य ठाकरे हे विकास कामांसमोर स्पीड ब्रेकर म्हणून उभे राहतात. मुंबईतल्या सेंट्रल पार्कला विरोध, मेट्रोला विरोध असे अनेक विरोध आहेत. त्यामुळे त्यांच्या या भूलथापांना जनता आता बळी पडणार नाही, असे मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा