(Source: ECI/ABP News/ABP Majha)
''उद्धवजी, मग ऐनवेळी असं का केलं?; लोकसभेचा निकाल डोक्यात जाऊ देऊ नका''; पाटलांच्या पराभवाने पाटील संतापले
विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीतील जयंत पाटील (Jayant patil) यांचा पराभव छोट्या पक्षांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच, पराभवानंतर तडकाफडकी निघून गेलेल्या जयंत पाटील यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. तर, माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी ट्विट करुन स्पष्ट शब्दात आपली नाराजी बोलून दाखवली होती. विशेष म्हणजे महायुतीकडून जयंत पाटलांच्या पराभवासाठी महायुतीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला व्हिलन ठरवलं जात आहे. भाजप नेते आशिष शेलार, शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांनीही शिवसेना ठाकरे गटामुळेच शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाल्याचं म्हटलं आहे. आता, समाजवादी गणराज्य पक्षाचे नेते आणि माजी आमदार कपिल पाटील यांनी थेट उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सवाल केला आहे. कपिल पाटील (Kapil Patil) यांनी विधानपरिषद निवडणुकीतील पराभवाची खदखद यावेळी बोलून दाखवली.
विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. विशेष म्हणजे 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते, त्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. अखेर, या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली अन् त्याचा थेट फायदा मिलिंद नार्वेकरांना झाल्याचं दिसून येत आहे. मात्र, या निवडणुकीतील जयंत पाटील यांचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला असून भाजप छोट्या पक्षांना संपवत असल्याचा आरोप केला जाता. मात्र, आता महाविकास आघाडीतील बड्या पक्षांकडून काय होतंय, असा सवालही यानिमित्ताने विचारला जात आहे. कपिल पाटील यांनी विधानपरिषद निवडणुकीत त्यांच्या झालेल्या पराभवाची खदखदही यानिमित्ताने बोलून दाखवली.
उद्धवजी यांनी सांगितलं मुंबई शिक्षक मतदार संघ तुमचा, मग ऐनवेळी असं का केलं? असा सवाल माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला आहे. ''शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव धक्कादायक आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं या अगोदर मुंबईत शिक्षक भारतीची सीट घेतली, राजू शेट्टी यांच्याविरोधात उमेदवार देऊन त्यांचा पराभव केला. एकीकडे भाजप पक्ष पळवतो असं म्हणता, तर तुम्ही पण तसेच का वागत आहात. महाविकास आघाडीला डावे आणि वंचित पक्ष जवळ घ्यायचे आणि नंतर दूर लोटायचे आहेत. मविआने निर्णय घ्यायचा आम्हाला सोबत ठेवायचं की नाही,'' अशा शब्दात कपिल पाटील यांनी मनातील खदखद बोलून दाखवली.
लोकसभा निवडणुकीत छोट्या पक्षांनी मविआला मदत केली, नारायण नागोजी पाटील हे प्रथम विधानसभा सदस्य होते. मात्र, त्यांच्याच नातवाला म्हणजे जयंत पाटील यांना त्यांच्या शताब्दी अगोदर असं सभागृहातून बाहेर काढणं चांगलं नाही. जयंत पाटील हे सहज निवडून आले असते, असे म्हणत जयंत पाटील यांच्या पराभवाला ठाकरेच जबाबदार असल्याचं कपिल पाटील यांनी म्हटलं आहे.
लोकसभेचा निकाल डोक्यात जाऊ देऊ नका
राजू शेट्टी यांनाही दूर केलं, गावित यांची फसवणूक केली, शिक्षक भारतीची जागा लाटली. उद्धवजी यांनी सांगितलं मुंबई शिक्षक मतदार संघ तुमचा मग ऐनवेळी असं का केलं? असा सवाल कपिल पाटील यांनी विचारला आहे. तसेच,
लोकसभा निवडणुकीत लोकांनी दिलेला निकाल डोक्यात जाऊ देऊ नका, राज्यात अनेक प्रश्न आहेत, त्याकडे लक्ष द्या. तुम्हाला मते हवीत पण त्यांना बाजूला बसवायला नको. माझी उद्धव ठाकरे आणि कोणत्याही नेत्याशी चर्चा नाही. पण, आम्ही खंत व्यक्त केलीय, आता ते काय निर्णय घेतात पाहू. तरीही , धर्म निरपेक्ष लोकांविरोधात आम्ही जाणार नाही, असेही कपिल पाटील यांनी म्हटले आहे.