क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेले काँग्रेसचे दोन आमदार फुटणार?; महायुतीच्या संपर्कात असल्याची चर्चा
विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसची 7 मतं फुटल्याची चर्चा आहे. काही आमदारांनी क्रॉस व्होटींग केलं असून या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी महायुतीने नियोजनबद्ध कार्यक्रम आखला होता. त्यानुसार, विधानपरिषद (Vidhanparishad) निवडणुकीत काँग्रेसची मतं फोडून महायुतीने आपल्या सर्वच 9 उमेदवारांना विजयी केले. विशेष म्हणजे महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे कमी मतं असतानाही त्यांचे दोनही उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे शरद पवार यांनी पुरस्कृत केलेले शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे, काँग्रेसची 7 मतं फुटल्याचा आरोपही झाला आणि ते मतं फुटली हेही उघडकीस आलं. मात्र, काँग्रेसची (congress) नेमकी फुटलेली मतं कोणती, त्यांच्यावर काय कारवाई होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही संबंधित आमदारांवर (MLA) कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यातच, क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेल्या काँग्रेसच्या 2 नेत्यांनी महायुतीमधील (mahayuti) शिवसेना व भाजपमधील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्यामुळे दोन आमदार फुटणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसची 7 मतं फुटल्याची चर्चा आहे. काही आमदारांनी क्रॉस व्होटींग केलं असून या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील आनंदाश्रमात भेट घेतली. विशेष म्हणजे या भेटीनंतर आमदार हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं तोंडभरून कौतुक केलं आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते आणि नांदेड जिल्हयातील देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर हेही भाजपच्या गोटात दिसून आले आहेत. भाजप नेते संजय उपाध्याय यांची भेट घेतल्यानंतर आता त्यांनी गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे. दोघांची भेट घेण्याअगोदर आमदार अंतापूरकर यांनी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याची खात्रीलायक माहिती आहे. आता या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे विधानपरिषद निवडणुकांमध्ये अंतापूरकर यांच्यावरही क्रॉस व्होटिंगचा आरोप आहे.
अशोक चव्हाण यांनी मतं फोडल्याची चर्चा
दरम्यान, फुटीरवादीचा आरोप असलेल्या आमदारांवर कारवाईऐवजी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याची सुत्रांची माहिती असून विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या 7 आमदारांवर विधानसभा निवडणुकीपर्यंत कारवाई होणार नसल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यामुळेच, संबंधित आमदारांनी महायुतीमधील नेत्यांशी संपर्क साधत जवळीक वाढवल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काँग्रेसने उमेदवार प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची 28 मते दिली होती. या 28 पैकी 3 आमदारांनी सातव यांना मतदान न करता महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसने मिलिंद नार्वेकर यांना सहा मते दिली होती. यातील एक मत फुटल्याचाही संशय व्यक्त केला जातोय.अशोक चव्हाण यांच्याबरोबर असलेले काही आमदार तसेच अन्य काही आमदारांची मतं फुटल्याचे म्हटले जात आहे.
मुख्यमंत्री शिंदे देवमाणूस - खोसकर
नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील काही व्यावसायिकांची दुकाने, हॉटेल आहेत. ते हटविण्याचे काम सुरू आहे. एमएमआरडीएचा एक अधिकारी आलाय, तो जाणूनबुजून हे अतिक्रमण हटविण्याचे काम करतोय. स्थानिकांवर अन्याय केला जातोय, 350 कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याने मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, अशी माहिती आमदार हिरामण खोसकर यांनी भेटीबाबत दिली. मात्र, या भेटीमागून वेगळंच राजकारण शिजत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. कारण, विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा आरोप हिराम खोसकर यांच्यावर आहे. त्यातच, पक्षाकडून कारवाईची टांगती तलवारही त्यांच्यावर आहे. त्यामुळे, सेमगेम साधण्यासाठीच ते महायुतीच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवमाणूस आहे. माझे काम लगेच ऐकले. मी लोकसभा, विधानपरिषद निवडणुकीत पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले. महायुतीचे काम केले नसल्याने मुख्यमंत्री नाराज झाले आहेत, पण तरीही त्यांनी माझे काम ऐकले, असे कौतुक हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केले आहे.
उमेदवारी डावलल्यास काय, थेट इशारा
हिरामण खोसकर यांनी काही दिवसांपूर्वी एबीपी माझाशी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर नाराजी व्यक्त केली होती. विधान परिषद निवडणुकीत पक्ष श्रेष्ठींनी सांगितले त्यांनाच मी मतदान केले आहे. माझ्यासह 7 आमदारांना मिलिंद नार्वेकरांनाच पहिल्या पसंतीचे मतदान करण्यासाठी सांगितले होते, त्यानुसार आम्ही मत दिले आहे. जयंत पाटील यांना ज्या 6 आमदारांनी मतदान केले त्यांचे मतं फुटले, त्यावर पक्षश्रेष्ठी का बोलत नाही? त्या 6 जणांवर कारवाई का करत नाही? असा सवाल खोसकर यांनी थेट प्रदेशाध्यक्षांनाच विचारला होता. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी काँगेस पक्षाची बैठक झाली. त्यात निवडणुकीला तयारीला लागण्याच्या सर्वांना सूचना मला देण्यात आल्या आहेत. मला उमेदवारी मिळणार, अशी अपेक्षा आहे. पण, जर उमेदवारी डावलली तर स्थानिक नेते बोलतील, त्याप्रमाणे निर्णय घेणार असल्याचेही खोसकर यांनी म्हटलंय. त्यामुळे, ते शिंदेंसोबत जाऊन धनुष्यबाण हाती घेतील, अशीही चर्चा होत आहे.
अंतापूरकर देगलुरचे आमदार
विधानपरिषद निवडणूकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला परभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता या आमदारांवर कठोर कारवाईची मागणी केली जातेय. ज्या आमदारांनी पक्षाचा आदेश डावलला त्या आमदारांच्या नावात देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. पक्षाने कारवाईचे संकेत दिल्यानंतर त्यांनी नुकतेच भाजप खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याची घटना महत्वाची ठरत आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत अंतापूरकर यांनी काँग्रेसचा प्रचार केला नाही. याशिवाय राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीतही त्यांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान, एकीकडे पक्षाकडून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असतानाच अंतापूरकर लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा नांदेड जिल्ह्यात सुरू आहे.
कोण आहेत अंतापूरकर
जितेश अंतापूरकर हे खासदार अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय समजले जातात. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर अंतापूरकरही भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, पक्षांतरबंदीच्या कायद्यामुळे काही नेत्यांनी भाजप प्रवेश टाळल्याचे सांगितले जात होते. अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ देगलूर विधानसभेचे आमदार जितेश अंतापूरकर आणि नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार मोहनराव हंबर्डे काँग्रेसचा हात सोडण्याची शक्यता असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. येत्या आठवड्यात हे दोन आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे.