(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India China Clash : भारत-चीन सीमेवरील संघर्षाने संसदेचा पारा वाढला
India China Clash : भारत चीन सीमेवर पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झालीय. अरुणाचलजवळच्या तवांगवर दोन्ही देशाच्या सैन्यात संघर्षाची ठिणगी पडली. आज त्यावरुन देशाच्या संसदेतही बराच गदारोळ पाहायला मिळाला.
India China Clash: भारत चीन सीमेवर (India China Border) अरुणाचल प्रदेशजवळ (Arunachal Pradesh) संघर्षाचा भडका उडाला आणि इकडे राजधानी दिल्लीपर्यंत त्याची धग जाणवायला लागली. आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Parliament Witer Session) त्याचे वादळी पडसाद पाहायला मिळाले. या मुद्द्यावर स्थगन प्रस्तावाची नोटीस देत चर्चेची मागणी काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेससह अनेक विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली. दुपारी 12 वाजता लोकसभेत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी अखेर यावर अधिकृत निवेदन दिलं. या प्रकरणात एकही जवान शहीद झाला नसल्याचं त्यांनी सभागृहाला सांगितलं, चीनचा (China) प्रयत्न सैनिकांनी हाणून पाडल्याचंही त्यांनी म्हटलं.
विरोधकांचा सभात्याग
पण संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात चर्चा घडवून आणण्यास मात्र नकार देण्यात आला. त्याचा निषेध म्हणून विरोधकांनी (Opposition) सभात्याग केला. सरकार या प्रकरणाची माहिती चार-चार दिवस लपवून का ठेवतं याबद्दलही विरोधकांनी सवाल उपस्थित केला.
अमित शाह यांच्याकडून राजीव गांधी फाऊंडेशनचा मुद्दा उपस्थित
दुसरीकडे मुद्दा चीनचा आहे. काँग्रेस आक्रमक झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पुन्हा इतिहासाला उजाळा दिला. गलवान घडल्यानंतर काँग्रेसचे नेते चिनी राजदूतांना भेटत होते, त्यांच्या मदतीने राजीव गांधी फाऊंडेशनचं (Rajiv Gandhi Foundation) काम कसं चालतं हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
चीनच्या कुरापती सुरुच
15 जून 2020 रोजी चीनने लडाखमध्ये गलवान खोऱ्यात आगळीक केली होती. त्यानंतर आता पुन्हा चीनच्या कुरापती सुरुच आहेत. मागच्या महिन्यातच इंडोनेशियाच्या बालीमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)एकमेकांसमोर होते. अर्थात त्यात कुठली ठोस द्विपक्षीय चर्चा अपेक्षित नसली तरी या भेटीने दोन्ही देशातला तणाव हलका झाल्याचं मानलं जात होतं, त्यातच ही घटना घडली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने भारत-चीन सीमा तणावाखाली आहे. आता ताजी घटना अरुणाचल प्रदेशातली आहे. मागच्यावेळी तणाव शांत व्हायला जवळपास दीड-दोन वर्षे लागली होती. त्यामुळे आता ताजी स्थिती किती वेगाने शांत होते हे पाहावं लागेल.
संबंधित बातमी