आमच्यात खात्यांबाबत वाद नाही, त्यांना एखादं खातं हवं असेल तर आम्ही देऊ; खातेवाटपावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Ministers Portfolio: शिंदे मंत्रिमंडळाच्या खातेवाटप जाहीर झाले आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Ministers Portfolio: शिंदे मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले आहेत की, त्यांना आमच्याकडील एखादं खातं हवं असेल तर आम्ही देऊ. तसेच आम्हाला त्यांच्याकडील एखादं खातं हवं असले तर आम्ही घेऊ. आमच्यात खात्या संदर्भात कुठलाही वाद नसल्याचं, माध्यमांशी बोलताना ते म्हणाले आहेत.
माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले आहेत की, ''खातं कुठलं आहे, हे महत्वाचं नाही. ते चालवणारे व्यक्ती योग्य असले पाहिजे. त्या दृष्टीने त्यांच्याकडे असलेले खाते पुढील विस्तारात त्यांच्या लोकांना मिळतील. तसेच आमच्याकडील खाते आमच्या लोकांना विस्तारात मिळतील. त्यात काही बद्दल करण्याची आवश्यकता भासली तर आम्ही बसून ते करू.''
पुढील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?
पुढील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, ''असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले आहेत की, विस्तार कधी करायचा याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे मुख्यमंत्र्यांना आहे. योग्य वेळ पाहून ते ठरवतील.'' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, मी उद्धव ठाकरे यांच्याकडे परत कधीही जाणार नाही. अडीच वर्षांचा फॉर्मुला भाजपने कधीच सांगितला नव्हता. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले आहेत की, ''मुख्यमंत्री काय म्हणाले हे मला माहित नाही. मात्र त्यांच्या म्हणण्यात पूर्ण तथ्य आहे. अडीच वर्षांचा फॉर्मुला कधीही ठरला नव्हता. मी पहिल्या दिवसापासून हे सांगत आहे. कारण मी याचा साक्षीदार आहे. कारण वाटाघाटी मी स्वतः केल्या होत्या. त्यामुळे अडीच वर्षांचा फॉर्मुला कधीही नव्हता. मात्र आता झालं ते आता निघून गेलं.''
दरम्यान, शिंदे सरकारचं खातेवाटप जाहीर झालं असून सगळी महत्वाची ही भाजपच्या पारड्यात पडल्याचं चित्र आहे. जाणून घेऊ कोणाला कोणतं खातं मिळालं आहे.
- राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
- सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
- चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
- डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास
- गिरीष महाजन- ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
- गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
- दादा भुसे- बंदरे व खनिकर्म
- संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन
- सुरेश खाडे- कामगार
- संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
- उदय सामंत- उद्योग
- प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
- रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
- अब्दुल सत्तार- कृषी
- दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
- अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
- शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क
- मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास