Dhananjay Munde: वाल्मिक कराडचा एन्काऊंटर, राजीनामा, पालकमंत्री; मंत्री धनंजय मुंडे मीडियासमोर पहिल्यांदाच बोलले
Dhananjay Munde: बीडची घटना अतिशय दुर्दैवी आहे, त्या घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी हीच सगळ्यांची भूमिका आहे. या घटनेशी माझा काहीही संबंध नाही, असे मंत्री धनजंय मुंडेंनी म्हटलं.
मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात बऱ्याच दिवसांनी परळीचे आमदार आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी माध्यमांशी संवाद साधला. विशेष म्हणजे खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या आणि सरपंच हत्याकांडाचा मास्टरमाईंड असा आरोप असलेल्या वाल्मिक कराडला (Walmik Karad) पोलिसांनी अटक केल्यानंतर धनंजय मुंडेंची प्रथमच आपली बाजू मांडली आहे. तत्पूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन बंद दाराआड चर्चाही देखील केली. या बैठकीतील चर्चा गुलदस्त्यात आहे, मात्र मुंडेंनी बीड हत्याप्रकरण व वाल्मिक कराडवर आपली भूमिका मांडली. तर, वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होऊ शकतो, यावरही धनजंय मुंडेंनी स्पष्टीकरण देत विजय वडेट्टीवार हे बोलण्यात हुशार असल्याचं त्यांनी म्हटलं.
मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा, विजय वडेट्टीवारांचे वक्तव्य, वाल्मिक मुंडे, राजीनामा आणि हत्याप्रकरणाच्या तपासावरही भाष्य केलं. बीडची घटना अतिशय दुर्दैवी आहे, त्या घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी हीच सगळ्यांची भूमिका आहे. या घटनेशी माझा काहीही संबंध नाही, कुणाचाही राजीनामा मागायचा सध्या असं चाललंय असे धनंजय मुंडेंनी म्हटलं. तसेच, आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडेंना बिनखात्याचे मंत्री करा अशी मागणी केली आहे. त्यासंदर्भात बोलताना मुंडे म्हणाले की, बिनखात्याचं मत्री कसं करता येतं हे शासनाने त्यांच्याकडून संपूर्ण माहिती करुन घ्यावं. बीडच्या पालकमंत्रीपदाबाबत जो काही निर्णय असेल तो आमचे नेते अजित दादा घेतील, असेही मुंडेंनी म्हटले.
दबावाचा प्रश्नच नाही
बीडमधील पोलीस ठाण्यात अचानक 5 पलंग मागवले, एकंदरीतच याबाबतीत पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय. या आधीच खाटा मागवल्या आहेत, असे मंत्री धनंजय मुंडेनी म्हटले.तर, तपास यंत्रणांवर दबाव टाकण्याचा विषयच नाही. कारण, हा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. तसेच न्यायालयीन देखील होणार आहे, म्हणून माझ्या दबावाचा प्रश्नच नाही, असेही धनंजय मुंडेंनी म्हटले.
वडेट्टीवार बोलण्यात हुशार
विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरही धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली. विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत, पण असं काही नाही. प्रशासन तपास करतंय. संतोष देशमुखची हत्या करणाऱ्यांना फास्ट ट्रकमधून फासावर चढवणे आमचा उद्देश आहे. या प्रकरणात फास्ट ट्रॅकची मागणी पहिल्यांदा मी केली होती, असे स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी दिले.
हेही वाचा
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा