धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!
Vijay Wadettiwar on Dhananjay Munde : मंत्रिमंडळातून धनंजय मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी होत आहे. आता विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केलाय.
Vijay Wadettiwar : बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Case) चांगलेच तापले आहे. या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) मास्टरमाइंड असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. आता विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठा दावा केलाय.
विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नाराजीबाबत विचारले असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, त्यांच्याकडे नाराजी व्यक्त करून पर्याय काय? एक तर भाजपकडे जा नाहीतर घरी बसा. ओबीसी नेत्याचा महाराष्ट्रात सरकारने दुरुपयोग केलाय आणि त्यांना सत्तेबाहेर ठेवलं. मोठ्या नेत्याला मतं मिळाली, याचा फायदा भाजपला झाला. भुजबळ यांना भोपळा दिला. ओबीसीला गृहीत धरून ओबीसीच्या भावनांशी खेळणारं हे सरकार आहे. भुजबळ यांचाकडे आता फार काही पर्याय नाही, असे त्यांनी म्हटले.
विजय वडेट्टीवारांचा दावा
ते पुढे म्हणाले की, धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा समावेश करण्याचा विचार अजितदादांच्या मनात आहे का? अजित पवार मुंडे यांच्या प्रकरणात अजिबात बोलत नाही. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असताना अजितदादा शांत बसले. यात कुछ तो गडबड है... भुजबळ यांना वेट अँड वॉचची भूमिका ठेवावी लागेल, असा दावा त्यांनी केला आहे. छगन भुजबळ यांच्या बाबत अजित पवार निर्णय घेतील, नाहीतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुसरा पर्याय आहे. देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या भेटीत काहीतरी नक्कीच झालं असेल. भुजबळ यांना देशाचा ओबीसीचा नेता भाजप करेल, तो पर्याय भुजबळांना खुला राहील, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो
संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता. मात्र 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड पुण्याच्या सीआयडी कार्यालयात शरण आला. वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर बीड पोलीस स्टेशनमध्ये पलंग आणल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, पोलीस स्टेशनमध्ये बेड घेऊन गेलेत, यापूर्वी असे कधी झाले नाही, हे कोणाचे लाड आहेत? वाल्मिक कराडचे लाड पुरवेल जात आहे, यावर चौकशी झाली पाहिजे. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो, एका जवळच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने मला खात्रीलायक माहिती दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा