Ambadas Danve on Walmik Karad : अंबादास दानवेंनी वाल्मिक कराडच्या बॉडी लँग्वेजमधील 'ती' गोष्ट हेरली, फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता. मात्र 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड पुण्याच्या सीआयडी कार्यालयात शरण आला.
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde)एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. अनेकदा पोलिसांना कराड आदेश द्यायचे, असा दावा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाचा खटला बीड जिल्हा सोडून पुणे, नगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये चालवला पाहिजे, अशी मागणी त्यांनी फडणवीस सरकारकडे केली आहे.
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर आरोप केला जात आहे. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता. मात्र 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड पुण्याच्या सीआयडी कार्यालयात शरण आला. वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावरून अंबादास दानवे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
CDR चेक करून सर्वांवर कारवाई करायला हवी
अंबादास दानवे म्हणाले की, वाल्मिक कराडसाठी वकिल देशपांडे यांनी खटला लढायला नकार दिला. सरकारने खातरजमा केली पाहिजे की ते नकार का देत आहे. ते घाबरत आहे का? केज पोलीस स्थानक वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करायला तयार नव्हते. राज्याची स्वतंत्र टीम असली पाहिजे. बीड जिल्हा सोडून पुणे, नगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये खटला चालवला पाहिजे. ज्या ठिकाणी पोलिसच त्यांच्यासोबत उठतात, बसतात, तिथे काय चौकशी होणार? वाल्मिक कराड बिनधास्त राहत आहे हे त्याच्या बॉडी लँग्वेजने दिसतंय. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी असलेले सर्व यात दोषी झाले पाहिजे. खटले लागले पाहिजे. CDR चेक करून सर्वांवर कारवाई करायला हवी, असे त्यांनी म्हटले.
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एका नाण्याच्या दोन बाजू
ते पुढे म्हणाले की, सुरेश धस यांचा इशारा कोणाकडे हे सुस्पष्ट आहे. मी आका-बाका म्हणत नाही. आका सगळे माहीत आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे संबंध सर्वांना माहीत आहे. नागपुरात वाल्मिक कराड असल्याचा मी केलेला आरोप असूनही मला पोलिसांचे फोन आले नाही. ते नागपुरात कोणाला भेटायला आले होते? ते ज्यांना भेटायला आले होते ते ३ दिवस अधिवेशनात आलेच नव्हते. तुमचा जर रोल नसेल तर तुम्ही सुस्पष्ट भूमिका मांडली पाहिजे, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. तर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. अनेकदा पोलिसांना कराड आदेश द्यायचे, असा दावा देखील अंबादास दानवे यांनी केलाय. सरकार वाल्मिक कराडला वाचवत होते. पोलिसांनी ठरवले तर स्वर्गातून पण शोधतील. मात्र, राजकीय वरदहस्त आल्यावर काय होऊ शकतं? हे आपण पाहिले आहे, असेही त्यांनी म्हटले.
सत्तारांचा वक्त येईल की दौर येईल हे पाहावे लागेल
राज्याच्या मंत्रिमंडळातून अब्दुल सत्तार यांना डावलल्यानंतर ते नाराज असल्याची चर्चा रंगली होती. यानंतर अब्दुल सत्तार यांनी कुछ देर तक खामोशी है, फिर शोर आयेगा, तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर आयेगा, अशी शेरोशायरी करत आपल्या भावना मांडल्या. याबाबत विचारले असता अंबादास दानवे म्हणाले की, अब्धील सत्तार यांना मंत्रिपद मिळाला नाही. त्यांना मंत्रिपद मिळेल की नाही हे माहीत नाही. त्यामुळे त्यांचा वक्त येईल की दौर येईल हे पाहावे लागेल, असा टोला त्यांनी अब्दुल सत्तारांना लगावलाय.
आणखी वाचा