सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
जो कोणी या प्रकरणात दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराच मंत्री शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दिला.
Sanjay Shirsat: राज्यात महायुती सरकार आले असले तरी मंत्रीमंडळात घेताना काही जुन्या नेत्यांना वगळण्यात आल्याने नाराजी असल्याची चर्चा राज्यभर झाली. निवडणूक जिंकली असली तरी मंत्रीपदाने हुलकावणी दिलेल्या अब्दुल सत्तारांऐवजी (Abdul Sattar) संजय शिरसाटांना संधी दिल्यानंतर राजकारणाला वेग आलाय. दरम्यान, मी पुन्हा येणार असं वक्तव्य करत मंत्रिमंडळात येण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर शिरसाटांना सत्तारांची दादागिरी मोडून काढण्याचा इशारा दिलाय. दुसऱ्याच्या जमिनी हडपणे हा गुन्हाच आहे. हे गुन्हेगार स्वत:ला आम्हाला पाठबळ आहे, कोणाचा धाक नाही असं समजत असतील तर त्याला योग्य धडा देणार असल्याचं मंत्री संजय शिरसाट म्हणालेत. आता कोणतंही प्रकरण दाबलं जाणार नाही, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. जो कोणी या प्रकरणात दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराच मंत्री शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दिला. दरम्यान, सत्तारांनी बुधवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी पुन्हा मंत्रिमंडळात येईन असं म्हणत सत्कार सोहळ्यातील भाषण करताना सगळीच नाराजी बाहेर काढली.
आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर वाशिममधील 37 एकर गायरान जमीन सत्तेचा दुरुपयोग करून घोटाळा केल्याचा आरोप आहे.विधीमंडळ हिवाळी अधिवेशनातही विरोधकांना या मुद्द्यावरून सत्तारांना घेरल्याचे दिसून आले होते. सत्तारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमकही झाले होते. दरम्यान, आता पुन्हा मंत्रिमंडळात येणार असल्याचे सत्तारांनी म्हटल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी जमिन हडपणाऱ्याला पाठीशी घालणार नसल्याचं वक्तव्य केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
काय म्हणाले अब्दुल सत्तार?
महायुतीचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या अब्दुल सत्तार (Abdul sattar) यांना नुकतेच स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. निवडणुकांपूर्वीच त्यांचा भाजपचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्याशी वाद असल्याचं पाहायला मिळालं. तर, निवडणुकीनंतर त्यांच्या पक्षातील नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यासोबत त्यांचे खटके उडाल्याचंही दिसून येत आहे. कारण, आज वाढदिवसानिमित्त व आमदारकीच्या विजयाबद्दल अब्दुल सत्तार यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात भाषण करताना त्यांनी सगळंच काढलं. राजी, नाराजी, जिल्ह्यातील राजकारण, मंत्रिपद, एकनाथ शिंदे (Eknath Shinde), महायुती, पुढील अडीच वर्षे आणि मी पुन्हा येईन, असे म्हणत अब्दुल सत्तार यावर आपल्या भाषणातून बोलून दाखवलं.
पुढील अडीच वर्षात काय हे सांगता येणार नाही
बाळासाहेब ठाकरेंची सभा व्हायची आणि ती चर्चा वर्षभर राहायची. आज काही नाही, मी एक साधा कार्यकर्ता आहे, आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या कार्यकर्त्यांची परतफेड करण्यासाठी मी कमी पडणार नाही. मला पाच वर्ष मंत्री पदाची संधी मिळाली, पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही. कारण राजकारणामध्ये त्या गोष्टी कधीही पूर्ण होत नाही. फक्त आश्वासन दिले जातात, मलाही त्याची जाणीव आहे, असे म्हणत पुढील मंत्रिपदावरही त्यांनी भाष्य केलं.
हेही वाचा: