Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात तातडीची बैठक, अजित पवार ते प्रफुल पटेल, भुजबळ तटकरेंसह नवाब मलिकांची हजेरी, तीन मोठ्या मुद्यांवर चर्चा
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी पक्षाची तातडीची बैठक सुरु आहे. या बैठकीत महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची जनसन्मान यात्रा सुरु आहे. नाशिक, धुळे, जळगावनंतर अजित पवारांची जनसन्मान यात्रा पुण्यात दाखल झाली आहे. जनस्मान यात्रा सुरु असताना दुसरीकडे अजित पवार देखील सातत्यानं चर्चेत आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक सुरु असल्याची माहिती आहे. या बैठकीला प्रफुल पटेल, नवाब मलिक, छगन भुजबळ, शिवाजीराव गर्जे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित असल्याची माहिती आहे.
अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाचे बडे नेते पुण्यात आहेत. अजित पवार यांच्या पुण्यातील जिजाई निवासस्थानी बैठक सुरु आहे. या बैठकीला अजित पवार, प्रफुल पटेल, नवाब मलिक, छगन भुजबळ, सुनील तटकरे, शिवाजीराव गर्जे आणि इतर नेते उपस्थितआहेत. या बैठकीत राज्यातील पक्षाचे टॉपचे नेते उपस्थित आहेत. या बैठकीत राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेचे १२ आमदार त्यामध्ये कोणती नावं द्यायची याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय विधानसभेचं जागावाटप यावर महत्वाची चर्चा सुरु आहे. महायुतीत किती जागांवर दावा करायचा यावरही निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे.
अजित पवारांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात तर्क वितर्क
अजित पवारांनी पुण्यात बोलताना म्हटलं की,जय पवार यांना उमेदवारी देण्याच्या मागणीवर शेवटी निर्णय होईल. आमची जनता आणि त्या भागातील काही कार्यकर्ते मागणी करतील ते करायला तयार आहे.मी सात आठ वेळा लढलो आहे, त्यामुळे मला त्यात इंटरेस्ट नाही,शेवटी पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल की कोणाला उमेदवारी द्यायला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. जय पवारांना बारामतीमधून उमेदवारी द्यायची की नाही याचा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेईल, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार विधानसभेच्या रिंगणात असतील, असं म्हटलं.
नवाब मलिक पुन्हा सक्रीय
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री नवाब मलिक यांनी ते नेमक्या कोणत्या बाजूनं आहेत, याविषी यापूर्वी जाहीरपणे भूमिका घेतलेली नव्हती. आता नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर घड्याळ चिन्ह वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक पुन्हा सक्रीय झालेले पाहायला मिळतील. नवाब मलिक आज पुण्यात सुरु असलेल्या अजित पवारांसोबतच्या पक्षाच्या बैठकीला देखील हजर राहिले आहेत.
संबंधित बातम्या :