(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palghar News: मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या अन् शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार; पालघरमध्ये जीव मुठीत घेऊन विद्यार्थी गिरवतायत शिक्षणाचे धडे
Palghar News: पालघरमधील विक्रमगड तालुक्यातील बालापूर पाटील पाडा येथे जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवी पर्यंतची शाळा आहे. या शाळेत 85 विद्यार्थी शिक्षण घेत असून या शाळेची एक इमारत कोसळली आहे.
Maharashtra Palghar News: पालघर जिल्हा (Palghar District) परिषदेच्या शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे जिल्ह्यातील शेकडो शाळांची दुरावस्था झाली आहे. मोडकळीस आलेल्या वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागते आहे. मागील अनेक वर्षांपासून ग्रामस्थ आणि स्थानिक ग्रामपंचायतीनं ठराव देऊनही शिक्षण विभाग या वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्यानं स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. नादुरुस्त झालेल्या वर्ग खोल्यांमुळे विक्रमगड तालुक्यातील बालापूर, पाटील पाडा येथील विद्यार्थ्यांवर वरांड्यावर बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.
पालघरमधील विक्रमगड तालुक्यातील बालापूर पाटील पाडा येथे जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवी पर्यंतची शाळा आहे. या शाळेत 85 विद्यार्थी शिक्षण घेत असून या शाळेची एक इमारत कोसळली आहे. उरलेल्या एकमेव इमारतीमध्ये येथील विद्यार्थ्यांवर वरंड्यात शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. पहिली ते पाचवी पर्यंतचे पाच वर्ग असताना देखील एकच वर्ग खोलीत सध्या तिसरी चौथी आणि पाचवीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे वर्गात गर्दी होत असल्यानं दोन वर्गांना शाळेबाहेर शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत.
मागील तीन वर्षांपूर्वी याच शाळेतील वर्ग खोल्यांची भिंत खचून पडल्यानं शाळेची दुरुस्ती व्हावी म्हणून येथील गावकऱ्यांनी पालकांनी विक्रमगड गटविकास अधिकारी आणि पंचायत समितीच्या सभापतींची चर्चा करत या शाळेची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली. मात्र आज तीन वर्ष उलटून गेली, तरी पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून या ठरावावर आजपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. याच गावातील अनेक कुटुंब ही दिवाळीनंतर रोजगारासाठी स्थलांतरित होतात. त्यामुळे रिकाम्या झालेल्या घरांमध्ये या मुलांना शिक्षण दिलं जात होतं. मात्र आता पावसाळा सुरू झाल्यानं ही कुटुंब परत घरी परतल्यानं मुलांची मोठी गैरसोय झाली आहे. या शाळेची लवकरात लवकर दुरुस्ती केली नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांना पालकांकडून देण्यात आला आहे.
तर या प्रकरणाची तातडीनं दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला सूचना देऊन विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, अशी व्यवस्था करू आणि या अगोदर ज्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही, त्यांची चौकशी करून कारवाई करू, असं मत पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलं आहे.
पालघर जिल्ह्यात आजही शेकडो शाळांची दुरावस्था झाली आहे. स्थानिक ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांकडून नेहमीच यासाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला जातो. मात्र जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग या सगळ्याकडे दुर्लक्ष करत असून जिल्हा परिषदेकडून चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जात आहे.