Dr. Angelique Coetzee On Omicron: ओमिक्रॉन संक्रमित रुग्णांमधील ऑक्सिजनची पातळी कमी होते? वाचा काय म्हणाल्या डॉ. अँजेलिक कोएत्झी
Dr. Angelique Coetzee On Omicron: ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णाला अत्यंत थकवा, घसा खवखवणे, स्नायू दुखणे आणि कोरडा खोकला यांसारख्या समस्या जाणवतात.
Dr. Angelique Coetzee On Omicron: दक्षिण अफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉननं जगभरात दहशत निर्माण केलीय. दरम्यान, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील देश कठोर पाऊलं उचलताना दिसत आहेत. यातच दक्षिण अफ्रिकेच्या मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉक्टर अँजेलिक कोएत्झी यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत महत्वाची माहिती दिलीय. ओमिक्रॉनचा रुग्णांवर काय परिणाम होतो? तसेच रुग्णांमधील ऑक्सिजनची पातळी कमी होते का? हे देखील त्यांनी सांगितलंय.
दक्षिण अफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट B.1.1529 गेल्या आठवड्यात आढळून आला होता. जागतिक आरोग्य संघटनानं या व्हेरिअंटला चिंताजनक घोषीत केले होते. तसेच या व्हेरिएंटला ओमिक्रॉन नाव देण्यात आलं.
अँजेलिक कोएत्झी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या क्लिनिकमध्ये 18 नोव्हेंबरला सात रुग्ण आले होते. ज्यांना अंगदुखी आणि डोकेदुखीची समस्या होती. त्यांच्यात डेल्टा व्हेरिएंटपेक्षा वेगळीच लक्षण होती. जी खूप सौम्य होतं. ही लक्षणे व्हायरल फीव्हर सारखीच लक्षणे होती. यामुळं या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी अहवालातून त्यांना कोरोना असल्याचं निष्पन्न झालं. त्याचदिवशी त्यांच्याजवळ आणखी काही रुग्ण आले. त्यांच्यात आणि आधीच्या रुग्णांमधील लक्षणे एकसारखीच होती. त्यानंतर दररोज त्यांच्याजवळ अशी लक्षणं असलेली दोन, तीन रुग्ण येऊ लागले, असं अँजेलिक कोएत्झी यांनी म्हटलंय.
ओमिक्रॉनची काही लक्षणे आहेत जी पूर्णपणे वेगळी आहेत. संसर्ग झालेल्यांमध्ये ओमिक्रॉनची लक्षणे सौम्य आहेत. तर, काही रुग्ण रुग्णालयात दाखल न होताच बरे झाले आहेत. ऑमिक्रॉनचा संसर्ग झालेले आणि आतापर्यंत पाहिलेल्या सर्व रुग्णांचे लसीकरण झालेले नव्हते. त्यांना ओमिक्रॉनची सौम्य लक्षणे होती. आतापर्यंत ओमिक्रॉनची लागण झालेले आढळून आलेले बहुतेक रुग्ण 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, असे कोएत्झी म्हणाल्या आहेत.
ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णाला अत्यंत थकवा, घसा खवखवणे, स्नायू दुखणे आणि कोरडा खोकला यांसारख्या समस्या जाणवतात. या व्हेरिएंटमुळं रुग्णांच्या शरीराचं तापमान वाढतं. तसेच या नव्या व्हेरिएंटची लक्षणे करोनाच्या डेल्टा प्रकारापेक्षा खूपच वेगळी असल्याचंही कोएत्झी यांनी म्हटलंय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha