चारित्र्याच्या संशयावरुन महिलेला उकळत्या तेलातून 5 रुपयाचे नाणं बाहेर काढण्याची शिक्षा, व्हिडीओ व्हायरल
चारित्र्याच्या संशयावरून महिलेला उकळत्या तेलातून 5 रुपयाचे नाणं बाहेर काढण्यास नवऱ्याने सांगितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून जात पंचायतची अमानुष प्रकरणं समोर येत आहे. यात जात पंचायतचे अघोरी व अन्यायी न्यायनिवाडे व शिक्षेचे प्रकार पाहण्यास मिळतायेत. यामध्ये विशेषतः महिला बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. नुकताच अशा न्यायनिवाडा करण्याचा एक अमानुष प्रकारचा व्हिडिओ सोशल मिडीयात फिरत आहे.
पारधी समाजातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला. अशा वेळी जातपंचायत विचित्र न्यायनिवाडा करून महिलेचे चारित्र्य तपासते. सदर पतीने तीन दगडांची चुल मांडली. सरपण लावून चुल पेटवली. चुलीवर तेल टाकलेली कढई ठेवली. तेलाला उकळी आल्यावर नवऱ्याने पाच रूपयांचे नाणे त्या तेलात टाकले. व ते नाणे रिकाम्या हाताने बाहेर काढण्यास सांगितले. महिलेने खुप विरोध करूनही पतीने तीचे चारित्र्य तपासण्यासाठी तेलात हात घालण्याची जबरदस्ती केली. उकळत्या तेलातुन नाणे बाहेर काढताना महिलेचा हात भाजला नाही तर तिचे चारित्र्य शुद्ध असे समजले जाते व हात भाजला तर चारित्र्य शुद्ध नाही, असे समजले जाते. अशा अमानुष न्यायनिवाड्याला अनुसरून सदर महिलेने उकळत्या तेलात हात घातला व तिचा हात भाजला आहे. नवऱ्याने या घटनेचा व्हिडिओ काढला व व्हायरलही केला आहे.
या घटनेची चौकशी होऊन जात पंचायत विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी जात पंचायत मूठमाती अभियानचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे. असे न्यायनिवाडे अंधश्रद्धेवर अधारित असून अवैज्ञानिक आहे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडे या घटनेचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे.