Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या कामात स्थानिकांना रोजगार द्या; उद्घाटनस्थळी तरुणांची गर्दी, पोलीस यंत्रणेची धावपळ
Nashik News : समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण होत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाआधीच कार्यक्रमस्थळी अचानक ग्रामस्थ जमल्याने पोलीस यंत्रणेची मोठी धावपळ उडाली आहे.
Nashik News नाशिक : समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) तिसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण होत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा हा तिसरा टप्पा आहे.
इगतपुरी पथकर प्लाझा येथे मान्यवरांच्या हस्ते कोनशिला अनावरण होणार आहे. मात्र या कार्यक्रमाच्या उद्घाटनाआधीच कार्यक्रमस्थळी अचानक ग्रामस्थ जमल्याने पोलीस (Police) यंत्रणेची मोठी धावपळ उडाली आहे. समृद्धी महामार्गाच्या कामात स्थानिकांना रोजगार द्या, अशी मागणी स्थानिक तरुणांकडून करण्यात आली आहे.
स्थानिकांना रोजगार द्या
समृद्धी महामार्गाच्या कामात स्थानिकांना रोजगार द्या, अशी मागणी करत तरुणांनी कार्यक्रस्थळी गर्दी केली आहे. ज्यांच्या जमिनी गेल्या आहते त्यांना कामात सामावून घ्या, तरुणांना रोजगार द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. अचानक ग्रामस्थ जमल्याने पोलीस यंत्रणेची धावपळ उडाल्याचे चित्र आहे.
रोजगाराचा प्रश्न उपस्थित
ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारून त्यांना माघारी पाठवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे थोडयाच वेळात उद्घाटन होणार आहे. मात्र त्याआधीच ग्रामस्थ जमल्याने रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता यावर शासन काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
असा आहे समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा
समृद्ध महामार्गाच्या तिसऱ्या टप्यात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील 24.872 कि.मी लांबी एकूण 16 गावातून जात असून पॅकेज 13 अंतर्गत 23.251 कि.मी व पॅकेज 14 अंतर्गत 1.621 कि.मी लांबीचा समावेश आहे. या टप्प्यात पॅकेज 13 अंतर्गत 1 व्हायाडक्ट (200 मी लांबी), दारणा नदीवरील 1 मोठा पूल (450 मी), 8 छोटे पूल, वाहनांसाठी 5 भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी 8 भुयारी मार्ग, 9 ओव्हरपास, पथकर प्लाझा वरील 4 इंटरचेज, 14 टोलबूथ, 2 वे-ब्रिज, 1 टनेल-275 मी, 27 बॉक्स कल्वर्ट, 27 युटीलीटी डक्ट व पॅकेज 14 अंतर्गत 1 व्हायाडक्ट (910 मी लांबी), आदी सुविधांचा समावेश आहे.
समृद्धी महामार्गाच्या उर्वरित मार्गाचे काम प्रगतीपथावर
प्रकल्पाच्या या तिसऱ्या टप्प्याचा खर्च रुपये 1078 कोटी असून या टप्प्याच्या लोकार्पणामुळे 701 कि. मी. पैकी आता एकूण 625 कि.मी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीस उपलब्ध झालेला आहे. समृद्धी महामार्गाच्या उर्वरित मार्गाचे (इगतपुरी ते आमने) काम प्रगतीपथावर आहे. इगतपुरी इंटरचेंजचा वापर करुन ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुलभ व जलद होईल. 1 तासात शिर्डीला पोहचता येईल. याशिवाय शिर्डी, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येणे व जाण्यासाठी कमी कालावधी लागेल.
आणखी वाचा