मोठी बातमी : विधानसभेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर, जागावाटपाआधीच मोठी घोषणा
Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. जागावाटपाआधीच अजित पवार गटाने मोठी घोषणा केली आहे.
नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाने (NCP Sharad Pawar Group)विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटील आणि अमित भांगरे यांच्या नावाची घोषणा केली. या पाठोपाठ आता अजित पवार गटाकडून (NCP Ajit Pawar Group) विधानसभेसाठी जागावाटपाआधीच पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून नाशिक जिल्ह्यातील विविध मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. आज दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा सुनील तटकरे यांच्याकडून घेण्यात आला. यावेळी त्यांनी दिंडोरी मतदारसंघासाठी उमेदवाराची मोठी घोषणा केली आहे.
दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवाळ यांच्या नावाची घोषणा
सुनील तटकरे यांनी दिंडोरीचे विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या नावाची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, नरहरी झिरवाळ हे अख्या राज्याचे, सर्व समाजाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. ते केवळ आदिवासीचे नेते नाहीत. इथे सर्वांना गोकुळ झिरवळ यांच्याबाबत उत्सुकता आहेच. झिरवळ काय करणार? हा प्रश्न उपस्थित होतोय. झिरवाळ साहेब एकच करणार, जी टोपी तटकरेंच्या डोक्यावर घातली, त्या टोपीसह अजितदादांनी सोबत राहणार आहे. इथले उमेदवार घड्याळाच्या चिन्हावरच निवडणूक लढतील. मी मुद्दाम नाव घेतले नव्हतं, पण तुम्ही विचारणार म्हणून सांगतो, त्यांचे नाव आहे नरहरी झिरवाळ, असे म्हणत सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवाळ यांच्या नावाची घोषणा केली.
गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अजित पवार सत्तेत गेले
ते पुढे म्हणाले की, कोकणात पाऊस प्रचंड पडतो. पावसाचे आम्हला महत्त्व नाही. पण इथे पाण्याला महत्व आहे. शेती माल पाण्यावर अवलंबून आहे. सत्ता उपभोगण्यासाठी सत्तेत गेलो नाही. गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, शेतात 24 तास वीज देण्यासाठी अजित पवार सत्तेत गेले आहेत. जवळपास 1 लाख कोटी रुपयांच्या योजना जाहीर करताना, राज्याचे उत्पन्न वाढीवर लक्ष दिले आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करणे हाच एक आदेश आमच्यासाठी आहे.
अजितदादांची जनसन्मान यात्रा नाशिकमधून निघणार
राज्याच्या इतिहासात आजवर अनेक यात्रा निघाल्या. मात्र आता अजितदादांची जनतेचा सन्मान करणारी जनसन्मान यात्रा नाशिकमधून काढणार आहोत. दूध उत्पादक शेतकरी अनुदान देण्याचा निर्णय घेतला. दुधाची भुकटी आयात न करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी यावेळी सांगितले. श्रीराम शेटे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने माझे रस्त्यात स्वागत केले, ही मोठी गोष्ट आहे.
आणखी वाचा